दोषी डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

0
14

तुमसर : शासकीय सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात गर्भवती महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाला. डॉ. संध्या डांगे यांच्या निष्काळजीपणामुळे महिलेला जीव गमवावा लागला. डॉ. डांगे यांची केवळ बदली न करता त्यांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी भाजप महिला पदाधिकार्‍यांनी तहसिलदारांमार्फत राज्याच्या आरोग्यमंत्र्याकडे निवेदन पाठविले आहे.
जयश्री ठवकर यांचा मृत्यू डॉ. संध्या डांगे यांच्या निष्काळजीपणामुळे झाला. जयश्री ठवकर यांना रुग्णालयात सकाळी ११ वाजता दाखल करण्यात आले. डॉ. डांगे यांनी त्यांना सोनोग्राफी करण्यास सांगितले. सोनोग्राफीत गर्भातील बाळ दगावल्याचे दिसून आले. डॉ. डांगे यांनी उलट सर्व व्यवस्थित आहे, असे ठवकर दाम्पत्यांना सांगितले. त्यानंतर रात्री ९.३0 च्या सुमारास जयश्री ठवकर यांचा मृत्यू झाला.
डॉ. संध्या डांगे यांच्या निष्काळजीपणामुळे जयश्री ठवकर यांना आपला जीव गमवावा लागला. आरोग्य विभागाने डॉ. संध्या डांगे यांचे स्थानांतरण भंडारा येथे केले. स्थानांतरण रद्द करून त्यांना सेवेतून निलंबित करून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजप महिला आघाडी पदाधिकार्‍यांनी केली. शिष्टमंडळात भाजप महिला आघाडी अध्यक्षा कुंदा वैद्य, माजी नगराध्यक्षा गीता कोंडेवार, नगरसेविका शोभा लांजेवार, लक्ष्मी इळपाचे, सुषमा पटले, पुष्पा तलमले, भारती साठवणे, पद्मा बिसेनसह मोठय़ा संख्येने भाजप महिला कार्यकर्ता उपस्थित होत्या.