जनजागृती केल्यानंतरच व्यसनमुक्तीचा कायदा राबविणे शक्य: डॉ.अभय बंग

0
20

गडचिरोली, ता.10: व्यसनमुक्तीसाठी शासनस्तरावर कडक कायदे करण्यात आले आहेत. मात्र लोकशिक्षणाद्वारे प्रबोधन करुन समाजजागृती केल्यानंतरच त्यासंबंधीचा निर्बंधात्मक कायदा राबविता येईल, असे प्रतिपादन ‘सर्च’चे संचालक डॉ.अभय बंग यांनी  केले. तंबाखू व दारुमूक्त जिल्हा विकास कार्यक्रमांतर्गत सर्व विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची एकदिवसीय कार्यशाळा (ता.९) जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली, यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.

जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. प्रमुख पाहूणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल, सहायक जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनावणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी, दंततज्ज्ञ डॉ. कैलास नगराळे उपस्थित होते.

डॉ. बंग पुढे म्हणाले, गडचिरोली जिल्हा दारु व तंबाखुमुक्त व्हावा या हेतूने ‘मुक्तिपथ’ हे अभियान जिल्हयात सुरु होत आहे.  तंबाखू  व दारुचा वापर हे  भारतात रोग निर्मितीचे प्रमुख कारण झाले आहे.  त्यामुळे कॅन्सर, बीपी. लकवा, हृदयरोग असे अनेक रोग निर्माण होत आहेत. गडचिरोली जिल्हयात एकूण लोकसंख्येमध्ये ४० ते ६० टक्के लोक दारु किंवा तंबाखूजन्य पदार्थाचा वापर करतात. तंबाखू व दारु विकत घेण्यावर लोकांचा एकूण ३४० कोटी रुपये वार्षिक खर्च होतो. शिवाय आरोग्याचे व आर्थिक नुकसान प्रचंड होत आहे. समस्येचे हे स्वरुप बघता तंबाखू व दारुचा वापर वेगाने कमी करणे हे गडचिरोली जिल्हयाचे आरोग्य रक्षण व आर्थिक विकासासाठी आवश्यक ठरते. यापूर्वीचे अनुभव बघता फक्त बंदी किंवा व्यसनमुक्ती असे एकांगी काम करुन भागणार नाही, तर यासाठी अनेकांगी कार्यक्रमांचा वापर करुन ही समस्या नियंत्रित करण्याचे मुक्तिपथ  या अभियानांतर्गत ठरविले आहे, असेही ते म्हणाले. याकरिता शासनाने पुढाकार घेतला असून राज्यस्तरावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यगटाची स्थापना करण्यात आली आहे.  समाज जागृतीसाठी शासकीय विभाग, मुक्तीपथ, ग्रामसभा आणि प्रसार माध्यमे यांची महत्वाची भूमिका असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी नायक म्हणाले, प्रत्येक कार्यालय प्रमुखांनी आपल्या कार्यालयातील कर्मचारी व्यसनमुक्त  होण्यासाठी प्रयत्न करावे व त्याची माहिती वेळोवेळी अवगत करावी. कार्यालयातील जे अधिकारी व कर्मचारी संपूर्ण व्यसनमुक्त होऊन समाजात आदर्श निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतील त्यांचा येथोचित सत्कार करुन बक्षीससुध्दा प्रदान करण्याचा मनोदय असल्याचे ते म्हणाले.