विदर्भाचा लढा तीव्र करावा लागेल-राम येवले

0
13

तिरोडा,दि.20 : १९0५ पासून स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी असून त्यासाठी लढा सुरू आहे. २८ सप्टेंबर १९५३ ला विदर्भाला जनतेची सम्मती न घेता जबरन महाराष्ट्रात सामील केले. तेव्हापासून वैदर्भीय जनतेवर अन्याय सुरू आहे. यामुळे आता विदर्भाचा लढा तिव्र करावा लागणार असल्याचे प्रतिपादन विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य निमंत्रक राम येवले यांनी केले.
जवळील ग्राम कवलेवाडा येथील विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या जाहीर सभेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. पुढे बोलताना येवले यांनी, नागपूर करारानुसार २३ टक्के नोकरी विदर्भातील युवकांना द्यायची होती. फक्त आठ टक्के दिल्याने चार लाख नोकर्‍यांचा बॅकलॉग विदर्भात तयार झाला व बेरोजगारी वाढली. भारनियमन विदर्भात, वीज तयार होते विदर्भात व ३४ टक्के गळतीही विदर्भात, ६३00 मेगावॉट वीज तयार होऊनही विदर्भाला फक्त २२00 मेगावॉट दिली जाते. विदर्भाला विजेची गरज नसतानाही १३२ वीज प्रकल्प आणून ८६ हजार ४0७ मेगावॉट वीज तयार करून दिल्ली व मुंबई इंडस्ट्रीयल कॉरीडोर करिता पुरवठा केला जाणार. यासाठी एक लाख एकर सुपीक जमीन प्रकल्पाला जाईल. ९0 हजार एकर टॉवरलाईनमुळे शेतीचे उत्पादन घटणार व उष्णतामान वाढणार आहे. संपूर्ण विदर्भ कँसर, टिबी व ह्दयरोगाने ग्रस्त होणार. शेतीमालाला भाव मिलत नसल्याने कर्जापोटी ३६ हजार पेक्षा जास्त शेतकर्‍यांनी आत्महत्या केली. वीज नाही, पाणी नाही, शेतीपर्यंत रस्ते नसल्याचे सांगीतले.
अशात वेगळे झालो तर १00 टक्के नोकर्‍या विदर्भाच्याच तरूणांना मिळणार. गडकरी व फडणवीस यांनी निवडणुकीच्या वेळी आश्‍वासन दिले. जनतेने शिक्ला मारताच सत्तेत आल्यावर त्यांना भान राहिले नाही. यासाठी विदर्भातील जनतेने ३ व ४ ऑक्टोबर ला तिव्र आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी माजी आमदार दिलीप बंसोड, आनंद वंजारी, जिल्हाध्यक्ष टी.बी.कटरे, अर्चना नंदघळे, अँड. पराग तिवारी, अँड.हेमलता पतेह, अँड. माधुरी रहांगडाले, सुरेश धुर्वे, शामराव झरारिया, कृष्णकुमार दुबे, मोसीन खान, योगेश अग्रवाल, सरपंच देवल पारधी, ईश्‍वर रहांगडाले यांनीही मार्गदर्शन केले.
प्रास्तावीक जिल्हाध्यक्ष कटरे यांनी मांडले. संचालन हुपराज जमईवार यांनी केले. आभार शामराव झरारिया यांनी मानले. कार्यक्रमासाठी संजय मेश्राम, मनोज तुरकाने, मंदाकिनी गाडवे, सरिता चव्हाण, पुरनलाल भैरम, क्रांतीकुमार सावळे, सोनू पारधी आदिंनी सहकार्य केले.