30.9 C
Gondiā
Sunday, July 26, 2026
Home विदर्भ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करावे-अॅड.निलेश हेलोंडे पाटील

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करावे-अॅड.निलेश हेलोंडे पाटील

0
33

 वाशिम,दि.२० जानेवारी – मानोरा तालुक्यातील इंझोरी येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांची वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) अॅड. निलेश पाटील हेलोंडे यांनी सोमवारी १९ सांत्वनपर भेट घेतली. या कुटुंबांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर, त्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ तातडीने वेळेवर मिळवून देण्याचे निर्देश त्यांनी उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले. मानोरा तालुक्यातील इझोरी येथील डिगांबर गजानन इंगळे व शाम तुळशीराम शिंदे या दोन शेतकऱ्यांनी काही वर्षांपूर्वी नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली होती. या कुटुंबांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी अॅड हेलोंडे यांनी प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन भेट दिली.

यावेळी अॅड हेलोंडे यांनी स्व. शाम शिंदे यांच्या पत्नी संगीता शिंदे, त्यांच्या दोन मुली व मुलगा, तसेच स्व. डिगांबर इंगळे यांच्या पत्नी शितल इंगळे व त्यांच्या मुलांशी सविस्तर चर्चा केली. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची साधने आणि मुलांच्या शिक्षणाबाबत त्यांनी आस्थेवाईकपणे विचारपूस केली. शेतकरी आत्महत्या ग्रस्थ कुटुंबांना जगण्यासाठी भक्कम आधार मिळावा यासाठी अॅड. हेलोंडे यांनी
मुलांच्या शिक्षणासाठी शासनाकडून मिळणारा शैक्षणिक लाभ त्वरित मंजूर करणे. शेतात विहीर आणि पाईपलाईनची सोय उपलब्ध करून देणे. कुटुंबातील महिलांना अर्थार्जनासाठी पशुपालन, शिलाई मशीन मिळवून देणे, दोन्ही कुटुंबांना हक्काचे ‘घरकुल’ उपलब्ध करून देणे आदी लाभ देण्यासाठी प्रथम प्राधान्य द्यावे असे निर्देश संबंधीत यंत्रणांना दिले.या दौऱ्याप्रसंगी प्रभारी तहसीलदार उमेश बनसोड, गटविकास अधिकारी सुधाकर जाधव, तालुका महिला व बालकल्याण अधिकारी अनुप कदम, तालुका कृषी अधिकारी उमेश राठोड, ग्रामविकास अधिकारी सुरेश चव्हाण उपस्थित होते. तसेच पत्रकार राजू ठाकरे, सरपंच मनीषाताई दिघडे, माजी सरपंच हिम्मत राऊत यांच्यासह विविध विभागांचे कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

blank