अर्जुनी मोरगाव-जिल्हा मुख्यालयापासून लांब अंतरावर असलेल्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात मंगळवार, दिनांक २७ रोजी रक्त साठवण केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. या स्तुत्य उपक्रमामुळे आदिवासी व दुर्गम भागातील गोरगरीब रुग्ण, गरोदर माता तसेच तातडीने रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. रक्तासाठी जिल्हा रुग्णालयात जाण्याची गरज नसल्याने रुग्णांचे श्रम, वेळ व पैशांची बचत होणार असून तालुक्यात सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.
ग्रामीण रुग्णालयात रक्त साठवण केंद्र सुरू व्हावे यासाठी प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी प्रदीप ढोके हे गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने प्रयत्नशील होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून या कार्यासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. नंदा गेडाम तसेच संपूर्ण प्रयोगशाळा चमूचे मोलाचे सहकार्य लाभले.
या रक्त साठवण केंद्राचे उद्घाटन उपजिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तृप्ती कटरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी डॉ. सोनल मेश्राम, सामान्य रुग्णालय गोंदियाचे डॉ. बोदलकर, ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगावचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नंदा गेडाम, वैद्यकीय रक्त संक्रमण अधिकारी डॉ. पाल, वैद्यकीय अधिकारी डॉ. गाईन, वीणा ठाकरे, प्रियंका शेडमाके, कटरे निकिता तीरमारे आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी एका गरजू रुग्णाला रक्त संक्रमण देण्यात आले. ग्रामीण भागातील रुग्णांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार असून आपत्कालीन परिस्थितीत अनेकांचे प्राण वाचण्यास मदत होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.





