‘युवारंगा’त तरुणाईची ‘कलारंगा’ची उधळण
-विद्यापीठाचा युवक महोत्सव ‘युवारंगा’स सुरुवात
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने आयोजित युवक महोत्सव ‘युवारंगा’त तरुणाईकडून ‘कलारंगा’ची उधळण होत आहे. विद्यापीठाच्या युवक महोत्सवाचा उद्घाटन समारंभ अंबाझरी मार्गावरील गुरुनानक भवन येथे सोमवार, दि.९ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडला. यावेळी अध्यक्षीय भाषण करताना अधिष्ठाता डॉ. शामराव कोरेटी यांनी ‘युवारंग’ हा युवकांच्या स्वप्नांना पूर्ण करणारा मंच असल्याचे सांगितले.
माननीय कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मानव विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. शामराव कोरेटी यांनी भूषविले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. अजय चव्हाण, डॉ. योगेश भुते, अधिसभा सदस्य ॲड. मनमोहन वाजपेयी, श्री. राहुल हनवते, वित्त व लेखा अधिकारी श्री. हरीश पालीवाल, विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ. विजय खंडाळ, रोजगार व प्रशिक्षण अधिकारी डॉ. भूषण महाजन यांची उपस्थिती होती. युवक महोत्सवातून बौद्धिक आणि सांघिक भावना निर्माण होत असून प्रत्येक विद्यार्थ्यास आपले कलागुण सादर करण्यासाठी व्यासपीठ खूले असल्याचे डॉ. कोरेटी यांनी पुढे बोलताना सांगितले. आपल्या विविध कलागुणांना संपूर्ण जग पाहत असून आपले सर्वोच्च नैपुण्य सादर करावे, असे आवाहन डॉ. कोरेटी यांनी यावेळी केले.
प्रास्ताविक करताना विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ.विजय खंडाळ यांनी सांस्कृतिक कलागुणांची उधळण करणारा युवारंग असल्याचे सांगत २८ वर्षांपासून सुरू असलेला युवक महोत्सवात कलावंत विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. युवक महोत्सवात एकूण २२ स्पर्धा होणार असून विविध महाविद्यालयातील विद्यार्थी या महोत्सवात सहभागी होत असल्याचे त्यांनी सांगितले.
व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. अजय चव्हाण यांनी युवारंग विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा मंच असल्याचे सांगत सहभागी विद्यार्थ्यांनी उंच भरारी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. योगेश भुते यांनी एका छताखाली विविध कलागुण विद्यार्थी सादर करणारा हा युवक महोत्सव असल्याचे सांगितले. देशाला घडवायचे असेल तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार युवकांच्या कलागुणांना आकार देण्याचे काम या युवक महोत्सवाच्या माध्यमातून होत आहे. विद्यापीठाची शिक्षण प्रणाली विद्यार्थी केंद्रित होत असून स्वतः सोबत स्पर्धा करीत स्पर्धकांच्या भावनेने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. कलागुणांना व्यावसायिक संधी म्हणून उपलब्ध करून देणारा विद्यापीठाचा युवक महोत्सव असल्याचे अधिसभा सदस्य ॲड. मनमोहन वाजपेयी यांनी सांगितले. या युवक महोत्सवात कला रंग उधळण्याचे आवाहन त्यांनी केले. अधिसभा सदस्य श्री राहुल हनवते यांनी सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन करीत आभार श्री प्रकाश शुक्ला यांनी मानले.
*सुरांची उधळण*
युवक महोत्सवात पहिल्या दिवशी विविध गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये समूहगीत स्पर्धेत २१, शास्त्रीय संगीत स्पर्धेत २०, सुगम संगीत स्पर्धेत ४७, शास्त्रीय ताल स्पर्धेत १३, ताण वाद्य स्पर्धेत ११ संघ सहभागी झाले.





