तुमसरे मिल्क प्रॉडक्ट कंपनीच्या दुध डेअरीचे सांडपाणी बावनथडीत

0
13

भंडारा,दि.20 : काटेबाम्हणी येथील तुमसरे मिल्क प्रॉडक्ट कंपनीच्या दुध डेअरीचे सांडपाणी बावनथडी नदीच्या कालव्यात सोडण्यात येते. त्यामुळे हे पाणी रसायनमिश्रीत बनले आहे. हे पाणी पिकांना व जनावरांनाही जीवघेणे ठरत आहे, त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. विजेची कुणीही चोरी केली तरी गुन्हा दाखल करून अटक करण्यात येते. मात्र मागील अनेक वर्षांपासून तुमसरे मिल्क प्रॉडक्टकडून वीज चोरी सुरू असतानाही कारवाई होत नसल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले यांनी पत्रपरिषदेत केला.
यावेळी शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, उपजिल्हाप्रमुख संजय रेहपाडे, अनिल गायधने, मुकेश थोटे उपस्थित होते. यावेळी पटले म्हणाले, १८ फेब्रुवारी २0१२ रोजी वीज चोरी प्रकरणात या कंपनीवर धाड घालण्यात आली होती. त्यावेळी वीज चोरीचा गुन्हा दाखल करून सोडून देण्यात आले. त्यानंतर बावनथडी प्रकल्पाचा कालवा फोडून पाणी चोरी प्रकरणातही गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली नाही. दुधात भेसळ सुरू असतानाही या जीवघेण्या प्रकाराविरूद्ध प्रशासन कारवाई करीत नसल्याचा आरोप पटले यांनी केला. त्यामुळे कंपनीची राज्य गुप्तचर खात्यामार्फत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
यावेळी ते म्हणाले, काटेबाम्हणी येथील तुमसरे मिल्क प्रॉडक्ट कंपनीत दुधात भेसळ करण्यात येते. भेसळ करण्यासाठी पावडर मागविण्यात येते. या भेसळ दुधापासून लहान मुलांसह सर्वांना किडनी, लीव्हर व हृदयाचे आजार जडत आहेत. दुधाचा वापर चहापासून तर मिष्ठाण बनविण्यापर्यंत होतो.आता दिवाळी हा सण येणार आहे. मिष्ठाणात दुधाचा जास्त प्रमाणात वापर करण्यात येतो परंतू त्या मिष्ठाणात भेसळ होत असूनही ते तपासले जात नाही. तीन लाख रूपये एकर दराने विकत घेतलेली जमिन तुमसर कृषी उत्त्पन्न बाजार समितीला २३ लाख रूपयाने विकण्यात आल्याचा आरोप केला. या कंपनीचे मालक भाऊराव तुमसरे यांच्या मागे जे कुणी आहेत, त्यांचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
१८ फेब्रुवारी २0१२ रोजी तुमसरे मिल्क प्रॉडक्ट कंपनीत फिरत्या पथकाने धाड घातली. त्यावेळी त्यांना विजेची चोरी सापडल्यामुळे या पथकाने ५४ लाख ७८ हजार ४६५ रूपयांचा दंड ठोठावला. त्यानंतर तुमसरे यांनी २९ लाख ७८ हजार ४६५ रूपयांची दंडाची रक्कम भरली. त्यापैकी २५ लाख रूपये अद्याप जमा केली नसल्याचे सांगून या प्रकरणाची चौकशी करून आरोपींवर कारवाई करण्याची मागणी पटले यांनी यावेळी केली.