37.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ पोलीस भरती प्रक्रिया पारदर्शकपणे -पोलीस अधीक्षक गोरख भामरे

पोलीस भरती प्रक्रिया पारदर्शकपणे -पोलीस अधीक्षक गोरख भामरे

0
31

blank

गोंदिया,दि.01 : गोंदिया जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील एकूण ५९ पदांसाठी सुरू असलेली पोलीस भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी दिली आहे. तसेच भरतीत निवड करून देण्याच्या नावाखाली कोणीही आमिष दाखवत असल्यास त्वरित तक्रार करण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे.

दिनांक ११ फेब्रुवारी २०२६ ते २० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात आली आहे. निर्धारित निकषांनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची लवकरच लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. शारीरिक चाचणी व लेखी परीक्षेच्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करून नियमानुसार पात्र उमेदवारांची अंतिम निवड केली जाणार आहे.

भरती प्रक्रिया सुरुवातीपासून शेवटपर्यंत अत्यंत पारदर्शक ठेवण्यात आली असून कोणाचाही कोणत्याही प्रकारचा वशिला चालणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पोलीस खात्यातील किंवा खाजगी व्यक्तींकडून उमेदवार अथवा त्यांच्या नातेवाईकांकडे लाच किंवा कोणत्याही प्रकारची आर्थिक मागणी होत असल्यास संबंधितांनी त्वरित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अथवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवावी, असेही सांगण्यात आले आहे.

तक्रारीसाठी पुढील क्रमांकांवर संपर्क साधावा :
श्री. गोरख भामरे, पोलीस अधीक्षक, गोंदिया – ८३०८२७७०२०,                                                                श्री. अभय डोंगरे, अपर पोलीस अधीक्षक, गोंदिया – ७५०७१३३१००
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गोंदिया – (०७१८२) २५१२०३, ९२०९०४१०६४ किंवा १०६४

उमेदवार व पालकांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता सतर्क राहावे आणि पारदर्शक प्रक्रियेला सहकार्य करावे, असे आवाहन गोंदिया जिल्हा पोलीस प्रशासनाने केले आहे.

blank