24.3 C
Gondiā
Saturday, July 25, 2026
Home विदर्भ मुरखळा माल आणि लखमापूर बोरी येथील विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडण्याचे कारण गुलदस्त्यात

मुरखळा माल आणि लखमापूर बोरी येथील विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडण्याचे कारण गुलदस्त्यात

0
32

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील मुरखळा माल आणि लखमापूर बोरी येथील विद्यार्थ्यांची प्रकृती अचानक बिघडण्यामागे हत्तीरोगाच्या गोळ्या नसल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. पण प्रकृती बिघडण्यामागे नेमके कोणते कारण आहे हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य विभागाकडून गावात विविध आरोग्य उपक्रम राबविण्यासोबत गावात सर्व्हेक्षणही सुरू आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य पथके बाधित क्षेत्रात तळ ठोकून आहेत.

दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशनावरून परत येताच आमदार डॅा.मिलिंद नरोटे यांनी शनिवारी संध्याकाळी जिल्हा रुग्णालयात भरती असलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची स्वत: तपासणी केली. बदलत्या वातावरणामुळे प्रकृतीवर होणारे परिणाम दिसत असल्याचे ते म्हणाले. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती नियंत्रणात असून रक्तनमुन्यांच्या तपासणीचा अहवाल आल्यानंतर प्रकृती बिघडण्याचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकेल, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॅा.वर्षा लहाडे यांनी सांगितले.

​वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पाहणी

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे यांनी स्वतः बाधित गावाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे जाऊन उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांची विचारपूस केली आणि वैद्यकीय सोयीसुविधांची पाहणी केली. यावेळी सहायक संचालक (हिवताप) डॉ.नयना धुपारे नागपूर, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.माधव शिंदे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.सुजिता वाडीवे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.रुपेश पेंदाम यांनीही गावाला व रुग्णालयाला भेट देऊन तांत्रिक मार्गदर्शन केले.

685 नागरिकांची तपासणी पूर्ण

​आतापर्यंत गावातील 936 घरांना भेटी देऊन एकूण 685 नागरिकांची आरोग्य तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. तापाचे रुग्ण शोधण्यासाठी राबविण्यात आलेल्या जलद ताप सर्वेक्षणातून एकूण 29 रक्तनमुने गोळा करण्यात आले आहेत. त्यांची प्रयोगशाळेत तपासणी केली जात आहे. कीटकजन्य आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी कंटेनर सर्वेक्षण राबवून 1601 पाण्याचे साठे तपासण्यात आले. ज्यापैकी 99 साठ्यांमध्ये टेमिफॉसचा वापर करण्यात आला. तसेच, डासोत्पत्ती रोखण्यासाठी गावातील कायमस्वरूपी आणि तात्पुरत्या अशा एकूण 8 ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात आले आहेत.

​प्रशासनाचे आवाहन : “विद्यार्थ्यांची प्रकृती आता स्थिर असून घाबरण्याचे कारण नाही. आरोग्य विभाग सर्व आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करत आहे. नागरिकांनी आपल्या परिसरात स्वच्छता राखावी आणि काही लक्षणे आढळल्यास त्वरित जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा,” असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

blank