26.1 C
Gondiā
Monday, August 17, 2026
Home विदर्भ सशक्त नागरिक निर्माण करतील विकसित भारत-राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

सशक्त नागरिक निर्माण करतील विकसित भारत-राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

0
33
-राष्ट्रीय युवक संसद आणि राष्ट्रीय वादविवाद स्पर्धेचे उद्घाटन
-डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ लॉ चे ‘जस्टा काजा’ अंतर्गत आयोजन
नागपूर :सशक्त नागरिक विकसित भारत-विकसित महाराष्ट्र निर्माण करतील, असे प्रतिपादन माननीय वित्त व नियोजन, कृषी, कामगार, विधी व न्याय आणि मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ लॉ येथे २३ व्या ‘जस्टा काजा’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत राष्ट्रीय युवक संसद आणि राष्ट्रीय वादविवाद स्पर्धेचा उद्घाटन कार्यक्रम शुक्रवार, दि. २० मार्च २०२६ रोजी पार पडला. यावेळी राज्यमंत्री ॲड. जयस्वाल मार्गदर्शन करत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ लॉ च्या सभागृहात माननीय कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित राष्ट्रीय युवक संसद आणि राष्ट्रीय वादविवाद स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माननीय वित्त व नियोजन, कृषी, कामगार, विधी व न्याय आणि मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. अजय चव्हाण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ लॉ चे संचालक डॉ. रविशंकर मोर, ‘जस्टा काजा’ समन्वयक डॉ. प्रवीणा खोब्रागडे यांची उपस्थिती होती. सर्व नागरिकांना अधिकार हवे आहेत. मात्र, कर्तव्य पार पाडताना दिसून येत नाही. यात नागरिकांमध्ये अधिकारासोबतच कर्तव्याचे पालन करण्याची जागरूकता निर्माण करण्याची अधिक जबाबदारी विधीचे विद्यार्थी म्हणून आपणावर असल्याचे राज्यमंत्री ॲड. जयस्वाल पुढे बोलताना म्हणाले. या महाविद्यालयातून १९९३ मध्ये कायद्याचे शिक्षण घेतले असून या वास्तूत माझ्यासह माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक स्मृती जुडल्या आहेत. नवीन इमारती निर्माण होताना या स्मृती जपण्याचे आवाहन राज्यमंत्री ॲड. जयस्वाल यांनी केले. विकसित भारताच्या दिशेने महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना पुढील ५ वर्षानंतर अपेक्षित असलेली रोजगारवाढ, उद्योगवाढ, शाश्वत विकास आदी अनेक पैलूंचा प्रथमच गंभीरतेने विचार करण्यात आला आहे. समाजासमोर असलेल्या ज्वलंत समस्या रोजगार, नागरी स्वच्छता, पर्यावरण, आरोग्य या दृष्टीने शाश्वत विकासाचे ध्येय निश्चित करून विकसित भारत-विकसित महाराष्ट्र निर्माण करण्याचा संकल्प माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केला असल्याचे राज्यमंत्री ॲड. जयस्वाल म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) समस्या नसून व तंत्रज्ञानातील महत्त्वपूर्ण साधन असून याचा योग्य वापर करण्याचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. विधी क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी राजकारणात येत नवीन भारत निर्माण कार्यात सहयोग देण्याचे आवाहन त्यांनी केले.
*संस्कारमय संस्थेतून शिक्षण महत्त्वपूर्ण- डॉ. चव्हाण*
आपण सर्व संस्कारक्षम संस्थेचे घटक असून या वातावरणात घेतलेले शिक्षण भविष्यासाठी महत्त्वाचा पैलू ठरणार असल्याचे प्रतिपादन व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. अजय चव्हाण यांनी केले. एखादी संस्था, विद्यापीठ शताब्दी वर्ष पूर्ण करते. त्या गौरवशाली इतिहास संस्थेचा विद्यापीठाचा अनुभव आपल्या पाठीशी असतो. या वैभवास जपण्याची जबाबदारी आपली आहे. उच्च शिक्षण प्राप्त करीत उत्तुंग भरारी घेण्याचे आवाहन डॉ. चव्हाण यांनी यावेळी केले.
राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांना यावेळी त्यांच्या विधी शिक्षणातील पदवी संचालक डॉ. रविशंकर मोर यांनी प्रदान केली. प्रास्ताविक करताना संचालक डॉ. रविशंकर मोर यांनी वादविवादाशिवाय युवक संसद तसेच महोत्सव पूर्ण होऊ शकत नाही, असे सांगितले. राष्ट्रीय युवक संसदेत देशाच्या विविध भागातून आलेले १०० पेक्षा अधिक प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. महाराष्ट्र विधान भवन येथे आयोजित राष्ट्रीय युवक संसदेच्या माध्यमातून उत्साहपूर्ण युवकांमुळे लोकशाही जीवंत राहील, असे डॉ. मोर म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. सुजाता कोठारी व सिया चौधरी यांनी केले तर आभार राष्ट्रीय युवक संसद शिक्षक समन्वयक डॉ. ममता गोमासे यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनात राष्ट्रीय युवक संसद समन्वयक प्रा. ममता गोमासे, शिक्षक समन्वयक डॉ. प्रवीणा उराडे, प्रा. पवनकुमार यादव, वादविवाद स्पर्धा शिक्षक समन्वयक प्रा. अर्चना प्रांजले, प्रा. रश्मी चंदावार, अंकित शिरपतवार, वेदांशू पांडे, अनुज वेदांत व अनुष्का यांनी सहकार्य केले.