आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
मुंबई, दि. २६ :राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत महत्त्वपूर्ण घोषणा केली. धान पिकाला बोनस (प्रोत्साहनपर राशी ) देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक निर्णय घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या संदर्भातील निकष निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच अंतिम निर्णय जाहीर करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले. धान उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने लढा देणारे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यामुळे मोठे यश मिळाले आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आमदार मुनगंटीवार यांनी या विषयावर लक्षवेधी सूचना उपस्थित करून धान उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा विधानसभेच्या पटलावर पोट तिडकीने मांडली होती. धान उत्पादनासाठी वाढलेला खर्च, नैसर्गिक आपत्तींचे संकट आणि बाजारभावातील अस्थिरता यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून त्यांना तातडीने दिलासा देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले.
आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या धान उत्पादक जिल्ह्यांतील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सातत्याने विधानसभेत मांडल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदने सादर करत शेतकऱ्यांच्या अडचणींची सविस्तर माहिती वेळोवेळी दिली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिले.
धान उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी आ. मुनगंटीवार यांनी सातत्याने आणि आक्रमकपणे केलेल्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाला या प्रश्नाची गांभीर्याने दखल घ्यावी लागली. परिणामी धानाला बोनस देण्याबाबत सकारात्मक भूमिका जाहीर होणे ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बाब ठरली आहे.





