25.8 C
Gondiā
Wednesday, August 5, 2026
Home विदर्भ मिनी मंत्रालयातील विभागप्रमुख जि.प.उपाध्यक्षांना डावलू लागले

मिनी मंत्रालयातील विभागप्रमुख जि.प.उपाध्यक्षांना डावलू लागले

0
123

युतीच्या ‘शीत’युद्धाची झळ अधिकाऱ्यांना
गोंदि्या-  जिल्ह्याचे ‘मिनी मंत्रालय’ अर्थात जिल्हा परिषदेत भाजप आणि राष्ट्रवादी(अप) या दोन्ही पक्षांची सत्ता आहे. मात्र अलिकडे या पक्षांपमध्ये सत्तासंघर्ष तीव्र होताना दिसून येत आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्यात ‘शीतयुद्ध’ सुरू असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. दोन्ही पदाधिकारी जरी एकमेकांविरोधात उघडपणे बोलत नसले तरी त्यासंदर्भात अधिकाऱ्यांना धारेवर धरून स्पष्टीकरण सादर करण्यास सांगितले जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मिनी मंत्रालयात नेमके चालले तरी काय? असा सवाल उपस्थित होत आहे.
कोविड काळामुळे गोंदिया जिल्हा परिषदेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली. तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी मुदतवाढ मिळावी, यासाठी शासनाला पत्रव्यवहार केला होता. मात्र शासनाने तो प्रस्ताव नाकारला. परिणामी प्रशासकराज आला. त्यानंतर जिल्हा परिषदेची निवडणूक २०२२ ला पार पडली. त्यात जिल्ह्यातील मतदारांनी भाजपला सर्वाधिक जागा दिल्या. त्यातच राज्य स्तरावर राष्ट्रवादीत फाळणी झाली. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि तत्कालीन विनोद अग्रवाल यांचे चावी संघटन यांच्या बळावर भाजपने युती करत सत्ता स्थापन केली. या सत्तास्थापनेत सर्वसमावेशक बाजू घेण्यात आली. या युतीत सर्वंकषपणे सर्व पक्षांना न्याय देण्यात येईल, असा शब्द देण्यात आला होता, नव्हे तो पाळण्यात देखील येत आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांत शीतयुद्ध सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यात अध्यक्ष स्वत: निर्णय घेतात, असा देखील सूर आवळला जात आहे. गेल्या काही दिवसांचा आलेख बघता खुद्द राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष सुरेष हर्षे यांनी युती कायम राहावी, अशी बाजू घेत आणि आपल्यात श्रेयवादामुळे दुरावा निर्माण होवू नये म्हणून थेट जिल्हा परिषदेच्या सामान्य विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना आज, २२ एप्रिल रोजी पत्रव्यवहार करत थेट स्पष्टीकरण सादर करण्यासंदर्भात सांगितले. त्यात त्यांनी अनुकंपा पदभरती नियुक्तीचे आदेश देताना पालकमंत्र्यांना पाचारण करण्यात आले. मात्र आपण उपाध्यक्ष असताना मला का सांगण्यात आले नाही. त्याचबरोबर १३ एप्रिल रोजी अंगणवाडी पर्यवेक्षिकांना टॅब वितरीत करण्यात आले, त्याचीही माहिती का दिली नाही, असा प्रश्न केला. जिल्हास्तरीय सरपंच मेळावा घेत असताना हा विषय स्थायी समितीचा आहे. त्यात स्थायी समिती सदस्यांना कार्यक्रम केव्हा, कुठे आहे. याचीही माहिती देण्यात आली नाही. थेट एक दिवसापूर्वी निमंत्रण पत्रिका हातात देण्यात आल्याचा आरोपही होत आहे. अशात आता हा श्रेयवाद युतीच्या पत्थावर पडून युतीत सर्वकाही आलबेल नाही, याचीच नांदी देत आहे. या सर्व प्रकारात मात्र अधिकाऱ्यांना दोषी धरून त्यांना स्पष्टीकरण देण्यासंदर्भात पदाधिकाऱ्यांकडून पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या सर्व प्रकारामुळे आता युतीत काडी तर पडणार नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.

गेल्या काही दिवसांत अधिकाऱ्यांकडून कामचुकारपणा होत असल्याचे आणि समन्वय नसल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर कागदोपत्री कार्यक्रम करून सर्वसामान्यांना वेठीस धरण्याचा प्रकार दिसून येत आहे. असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. कार्यक्रम घेत असताना साधे विश्वासात घेतले जात नाही. निमंत्रण दिले जात नाही.
सुरेष हर्षे, उपाध्यक्ष जि.प. गोंदिया