अर्जुनी मोरगाव :मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून उन्हाळ्याची जाणीव होऊ लागली असून तालुक्यातील खांबी येथील वार्ड क्रमांक ३ मधील सौरऊर्जेच्या मीटर मध्ये बिघाड आल्याने सौरऊर्जेवर आधारित लघु पाणी पुरवठा बंद झाला आहे.पाणी पुरवठा बंद झाल्याने नागरिकांना पाण्याकरीता प्रचंड त्रास सहन करण्याची वेळ आली आहे.खांबी येथील वार्ड क्रमांक ३ मधील बौद्ध विहाराच्या परिसरात शासकीय विहीर असून त्या विहिरीवर वार्ड व इतर वार्ड येथील अनेक नागरीक पाणी भरायला येत असतात.या शासकीय विहिरीवर सौर ऊर्जेच्या लघु पाणी पुरवठ्याच्या माध्यमातून नळ लावण्यात आले असून काही महिने सौरऊर्जेवरील पाणी पुरवठा चालू होता.मात्र त्या ठिकाणी सौरऊर्जेवरील पाणी पुरवठा चालू, बंद करणारा विद्युत मीटर बिघाड झाल्यानंतर एक महिना लोटून हि बाब प्रशासनाने लक्षात न घेतल्याने मागील दिड ते दोन महिन्यापासून पाणी पुरवठा ठप्प झाला आहे.
याउलट शासकीय विहिरीवरती काही गावातील नागरीकांनी घरगुती मोटार पंप लावून आपल्या घरी पाईप लांबवून पाईपद्वारे पाणी घरी नेत येत आहे.विहिरीवरील लावलेल्या घरगुती मोटार पंप हटवण्याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाला अर्जाच्या माध्यमातून लक्षात आणून दिल्या गेले.मात्र या समस्याकडे दुर्लक्ष केले गेले आहे.
वार्ड क्रमांक ३ मधील सौरऊर्जा पाणी पुरवठा विद्युत मीटर हा बिघाड झाल्याने त्याला संबंधित कंपनीमध्ये दुरुस्ती करीता पाठविलेले आहे.दुरुस्त होऊन येताच परत मिटर लावून पाणी पुरवठा सुरु करण्यात येईल.तसेच खासगी पंप विहिरीवरुन काढण्यासंदर्भात प्रशासन नक्की विचार करेल अशी प्रतिक्रिया ग्रामपंचायत खांबीचे ग्रामपंचायत अधिकारी रोहीत मेश्राम यांनी दिली.





