32.5 C
Gondiā
Sunday, July 26, 2026
Home विदर्भ बोंडगावदेवी येथे वादळाचा कहर; जि.प. हायस्कूलचे छत उडाले

बोंडगावदेवी येथे वादळाचा कहर; जि.प. हायस्कूलचे छत उडाले

0
52

अर्जुनी-मोरगाव,दि.१०ः तालुक्यात सध्या दिवसभर प्रचंड उकाडा आणि सायंकाळी वादळी वारा व पावसाचे वातावरण निर्माण होत आहे.९ मे रोजी सायंकाळी बोंडगावदेवी परिसरात आलेल्या जोरदार वादळामुळे जिल्हा परिषद हायस्कूल बोंडगावदेवी येथील शाळेचे टिनाचे छत उडून गेल्याने शाळेचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
बोंडगावदेवी येथील जिल्हा परिषद हायस्कूल ही तालुक्यातील जुनी शाळा मानली जाते. संबंधित इमारत पूर्वी कौलारू स्वरूपाची होती. नंतर कवेलू काढून लाकडी बांधकामावर टिनाचे छत बसविण्यात आले होते. सुमारे १०५ फूट लांबीच्या या इमारतीमध्ये चार वर्गखोल्यांचा ब्लॉक असून, ९ मे रोजी आलेल्या प्रचंड वादळी वाऱ्यामुळे संपूर्ण टिनाचे छत उडून गेले. त्यामुळे वर्गखोल्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी १० मे रोजी सकाळीच शाळेला भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती संदीप कापगते, माजी सरपंच राधेश्याम झोळे, अमरचंद ठवरे, मुख्याध्यापक अनिल कापगते, संजय गिऱ्हपुंजे, के. एस. राऊत, भुमेश्वर लंजे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
पाहणीदरम्यान जि.प. अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी जि.प. उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती सुरेश हर्षे तसेच संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा करून नुकसानग्रस्त इमारतीच्या दुरुस्तीसाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.वादळामुळे शाळेचे मोठे नुकसान झाल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होण्याची शक्यता असून, लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

blank