गोंदिया : देशात सुरू होत असलेल्या जनगणनेमध्ये ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकाना नसल्याच्या निषेधार्थ गोंदिया जिल्ह्यातील ग्राम दतोरा येथे ओबीसी समाजाच्या वतीने जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रसंगी उपस्थित पदाधिकारी व समाजबांधवांनी स्पष्ट भूमिका घेत, “जोपर्यंत जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना समाविष्ट केला जात नाही, तोपर्यंत ओबीसी समाज जनगणनेत सहभागी होणार नाही व जनगणनेचा बहिष्कार करेल,” असा इशारा दिला.
कार्यक्रमात वक्त्यांनी सांगितले की, ओबीसी समाजाची अचूक लोकसंख्या समोर येणे अत्यंत आवश्यक आहे. जनगणनेत स्वतंत्र ओबीसी रकाना नसल्यामुळे समाजाच्या हक्कांवर अन्याय होत असून शासनाने तात्काळ ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, अशी मागणी करण्यात आली.यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी गावोगावी जाऊन जनजागृती करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच ओबीसी समाजाच्या हक्कासाठी एकजूट राहण्याचे आवाहन करण्यात आले.कार्यक्रमाला परिसरातील अनेक समाजबांधव, युवक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





