लाभ घेण्याचे आरोग्य प्रशासनाचे आवाहन
वाशिम, दि. २८ मे-वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालय आणि कारंजा उपजिल्हा रुग्णालय येथे अत्याधुनिक ‘टेलीमेडिसिन’ सेवा यशस्वीपणे सुरू आहे.ही डिजिटल आरोग्य सेवा केवळ ग्रामीण व दुर्गम भागातील रुग्णांसाठीच नाही, तर जिल्ह्यातील सर्वच स्तरांतील नागरिकांसाठी खुली असून सर्वांना याद्वारे तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला मिळणे सुलभ झाले आहे. ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापासून ते शहरातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रत्येकाला मुंबईच्या नामांकित जे. जे. हॉस्पिटल आणि के. ई. एम. हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला येथे पूर्णपणे निशुल्क (मोफत) मिळतो.
तज्ज डॉक्टरांच्या ‘दुसऱ्या मतासाठी’ (2nd Opinion) प्रभावी सुविधा
अनेकदा रुग्णांना आपल्या आजारावर अधिक चांगल्या उपचारांसाठी किंवा मोठ्या डॉक्टरांचे ‘दुसरे मत’ (2nd Opinion) घेण्यासाठी नागपूर, अकोला किंवा मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये धाव घ्यावी लागते. यामध्ये मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. नागरिकांनी विनाकारण मोठ्या शहरात जाऊन पैसे खर्च होऊ नयेत, यासाठी ही सेवा जिल्ह्यातच उपलब्ध आहे.
अशी आहे उपचार प्रक्रिया:ओपीडी (OPD) भेट: रुग्ण जेव्हा जिल्हा रुग्णालय किंवा कारंजा उपजिल्हा रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये (बाह्यरुग्ण विभाग) उपचारासाठी येतात.तेव्हा स्थानिक डॉक्टरांकडून रुग्णाची तपासणी केल्यानंतर, रुग्णाचा आजार लक्षात घेऊन डॉक्टरांमार्फतच रुग्णाला टेलीमेडिसिन विभागाकडे संदर्भित केले जाते.
थेट मुंबईच्या तज्ज्ञांशी संवाद: त्यानंतर रुग्णालयातील टेलीमेडिसिन विभागातून थेट मुंबईच्या ‘जे.जे.’ किंवा ‘केईएम’ रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधून, रुग्णाच्या आजारावर अचूक ‘दुसरे मत’ (2nd Opinion) व पुढील उपचारांचे मार्गदर्शन विनामूल्य मिळवून दिले जाते.
या प्रमुख आजारांवर मिळणार तज्ज्ञ सल्ला:हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब, त्वचारोग, मानसिक आरोग्य आणि बालरोग यांसारख्या विविध गंभीर आजारांचे अचूक निदान आणि पुढील उपचारांचे मार्गदर्शन आता मुंबईला न जाता स्थानिक पातळीवरच उपलब्ध आहे. इंटरनेट व व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून वैद्यकीय अहवालांचे (Reports) ऑनलाईन परीक्षण त्वरित होत असल्याने उपचार प्रक्रिया देखील अधिक वेगवान झाली आहे.
आतापर्यत अनेक रुग्णांना या सुविधेचा लाभ झाला आहे.याच सुविधेमुळे सर्वात मोठा फायदा जिल्ह्यातील एका जन्मतः चार पाय असलेल्या चिमुरड्या बालकाला झाला असून, याच सुविधेमुळे त्याला नवे आयुष्य मिळाले. वाशिम जिल्हा रुग्णालयातील टेलीमेडिसिन विभागाच्या संदर्भानुसार, या बालकावर मुंबईच्या के. ई. एम. हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांचे ‘दुसरे मत’ (2nd Opinion) नुसार के.ई.एम. हॉस्पिटल, मुंबई येथे यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून, हे बालक पूर्णपणे बरे झाले आहे.
जिल्ह्यात टेलीमेडिसिन सेवा पूर्ण क्षमतेने सुरू असून मुंबईचे तज्ज्ञ डॉक्टर रुग्णांना मार्गदर्शन करत आहेत. ओपीडीत येणाऱ्या ज्या रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांच्या दुसऱ्या मताची (2nd Opinion) गरज असते, त्यांना आमचे डॉक्टर स्वतः या विभागाकडे संदर्भित करतात. जास्तीत जास्त नागरिकांनी थेट जिल्हा रुग्णालय व कारंजा उपजिल्हा रुग्णालयातील टेलीमेडिसिन विभागाशी संपर्क साधून या सुविधेचा हक्काने लाभ घ्यावा.
_डॉ. अनिल कावरखे,जिल्हा शल्यचिकित्सक वाशिम





