31.8 C
Gondiā
Sunday, July 26, 2026
Home विदर्भ आरमोरी तालुक्यातील घाटांवर पोकलेन मशिनने वाळूउपसा !

आरमोरी तालुक्यातील घाटांवर पोकलेन मशिनने वाळूउपसा !

0
31

आरमोरी : आरमोरी तालुक्यातील काही वाळूघाटांवर सध्या वाळू माफियांनी कब्जा केला असून नियमांना धाब्यावर बसवून बेसुमार वाळू उपसा केला जात आहे. ज्या पद्धतीने हा सर्व कारभार सुरू आहे त्यावरून महसूल विभागाने वाळू तस्करांना मनमानी पद्धतीने वाळू उपसा करण्याची खुली सूट तर दिलेली नाही ना, अशी शंका निर्माण होत आहे.

वैनगंगा नदीच्या वघाळा घाटावर खुलेआम पोकपेन मशिन लावून बेसुमारपणे वाळूचा उपसा करण्यात आला. याच पद्धतीने देऊळगावच्या घाटावर तर दिलेली हद्द सोडून मोठ्या प्रमाणावर वाळू काढण्यात आली. त्यामुळे नदीपात्रात ठिकठिकाणी खड्डे तयार झाले आहेत. आरमोरी तालुक्याच्या महसूल यंत्रणेने अशा पद्धतीने बेसुमार वाळू काढण्याची खुली परवानगीच दिली की काय, अशी शंका त्या ठिकाणची परिस्थिती पाहिल्यानंतर यायला लागते. देऊळगाव येथील मंडल अधिकारी आणि तहसील कार्यालयासोबत असलेल्या मधुर संबंधामुळे सर्वकाही सुरळीत सुरू असल्याचे गावकऱ्यांचे म्हणने आहे.

देऊळगावच्या घाटावर आणि साठा केलेल्या रेतीच्या ठिकाणी योग्य पद्धतीने सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले नाहीत. विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरने दिवसा तर कधी रात्री बेरात्री वाळू काढली जाते. मात्र महसूल यंत्रणेने आतापर्यंत कोणतीही कारवाई नाही. किती वाळूचा उपसा केला याची तपासणी सुद्धा कधी करण्यात आलेली नाही.विशेष म्हणजे वघाळा घाटाचा लिलाव करताना यावर्षी ग्रामसभेची परवानगी सुद्धा घेण्यात आली नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. बेसुमार वाळू उपशामुळे पावसाळ्यात गावाला पूरस्थितीचा धोका उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याशिवाय रस्ते खराब होऊन वायुप्रदुषणाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.

यावर्षी या घाटाच्या लिलावाला ग्रामसभेने विरोध केला होता, पण ग्रामसभेचे काहीही ऐकून न घेता थेट लिलाव केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. त्यातही वघाळा जुना या घाटावर मर्यादेच्या पलिकडे उपसा झाल्यामुळे पाण्याच्या प्रवाहाची दिशा बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आधीच हे गाव पुरप्रवण स्थितीत आहे. त्यात गावाच्या बाजुने वाळू उपसा मोठ्या प्रमाणात केल्यामुळे गावाच्या जवळून प्रवाह सुरू झाल्यास पुराचा धोका निर्माण होऊन गावकऱ्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो. याला सर्वस्वी आरमोरी तहसील प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.गावकऱ्यांनी यासंदर्भात तहसील कार्यालयाकडे तक्रार दिली आहे. दोन दिवसांत कारवाई न झाल्यास वघाळावासियांनी कुटुंबियांसह ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा तहसीलदारांना दिला आहे.

blank