
नागपूर, 9 जून 2026:– वीज ग्राहकांशी असलेल्या विश्वासाचे नाते अधिक दृढ करत, महावितरणने आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी नागपुर परिमंडलातील 7 लाख 3 हजार 590 लघुदाब वीज ग्राहकांना सुरक्षा ठेवीवरील व्याजाचा तब्बल १३ कोटी १२ लाख ७७ हजार ४२८ रुपयांचा परतावा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा थेट लाभ नागपूर परिमंडलातील लाखो ग्राहकांना होणार असून, ही व्याजाची रक्कम त्यांच्या चालू वीजबिलात थेट समयोजित (Adjust) करण्यात येत आहे, ज्यामुळे ग्राहकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
या व्याजाच्या परताव्याचा लाभ परिमंडलातील नागपूर आणि वर्धा या दोन्ही जिल्ह्यांतील ग्राहकांना मिळणार आहे. यात नागपूर जिल्ह्यातील ५ लाख ९७ हजार ४२८ ग्राहकांच्या खात्यात ११ कोटी ६८ लाख २० हजार ४८४ रुपये, तर वर्धा जिल्ह्यातील १ लाख ३ हजार ६४२ ग्राहकांच्या खात्यात १ कोटी ४४ लाख ५६ हजार ९४४ रुपयांचे व्याज मे आणि जून महिन्याच्या वीज बिलात समायोजित करण्यात येत आहे.
सुरक्षा ठेव आणि व्याजाची प्रक्रिया अनेक ग्राहकांना सुरक्षा ठेव म्हणजे काय, ती का घेतली जाते आणि त्यावर व्याज मिळते का, असे प्रश्न पडतात. महावितरणकडे जमा असलेली सुरक्षा ठेव ही प्रत्यक्षात ग्राहकांचीच एक सुरक्षित ठेव असते. भारतीय रिझर्व्ह बँकेने वेळोवेळी निश्चित केलेल्या दरानुसार यावर महावितरणकडून व्याज दिले जाते. ग्राहकांकडून वेळेवर भरल्या जाणाऱ्या वीज बिलाच्या रकमेतूनच वीज खरेदी, वितरण जाळ्याचे सक्षमीकरण, तांत्रिक देखभाल आणि प्रशासकीय खर्च भागवला जातो. त्यामुळे ग्राहकांचे नियमित सहकार्य हे अखंडित वीज पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
महावितरण दरवर्षी वीज वापराच्या आधारे सुरक्षा ठेवीचे पुनर्निधारण (Review) करते. जर एखाद्या ग्राहकाचा वीजवापर वाढला असेल आणि त्या अनुषंगाने सुरक्षा ठेव दोन महिन्यांच्या सरासरी बिलापेक्षा कमी असेल, तर संबंधित ग्राहकाला अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे बिल दिले जाते. ही प्रक्रिया केवळ नियमांचे पालन करण्यासाठी नसून, भविष्यकाळात ग्राहकांच्या वीज पुरवठ्यात कोणतीही तांत्रिक अडचण येऊ नये, यासाठी आहे. ज्या ग्राहकांनी अतिरिक्त सुरक्षा ठेवीचा भरणा अद्याप केलेला नाही, त्यांची ही थकबाकी सध्या मिळणाऱ्या व्याजाच्या रक्कमेतून वळती केली जात आहे. मात्र, पूर्ण रक्कमेचा भरणा करणे ग्राहकांच्या हिताचे आहे.
सुरक्षा ठेव ही ग्राहकांच्या वीज पुरवठ्यासाठीची एक सुरक्षा कवच आहे. वीज पुरवठा कायमस्वरूपी बंद केल्यास ही ठेव व्याजासह परत केली जाते. त्यामुळे, आपल्या खात्याची स्थिती सुरक्षित ठेवण्यासाठी आणि भविष्यातील संभाव्य तांत्रिक अडथळे टाळण्यासाठी, सर्व संबंधित ग्राहकांनी त्यांना प्राप्त झालेल्या अतिरिक्त सुरक्षा ठेवीच्या बिलाचा त्वरित भरणा करावा. महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावरून मोबाईल ॲप, ऑनलाईन पेमेंट गेटवे, पेमेंट वॉलेटवरुन किंवा जवळच्या बिल भरणा केंद्रावर ग्राहकांनी ही रक्कम भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरण प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.





