29.7 C
Gondiā
Monday, June 29, 2026
Home विदर्भ देशसेवा-समाजसेवा महानतेचे प्रतीक – माजी सरन्यायाधीश श्री भूषण गवई

देशसेवा-समाजसेवा महानतेचे प्रतीक – माजी सरन्यायाधीश श्री भूषण गवई

0
8
-विद्यापीठाच्या वतीने पद्मश्री पुरस्कृत मान्यवरांचा नागरी सत्कार
नागपूर :आयुष्यात यशस्वी होऊन प्रतिष्ठित कोणीही होऊ शकतो. मात्र, आपले संपूर्ण आयुष्य त्यागून समाजसेवा-देशसेवा करणे हेच खरे महानतेचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने पद्मश्री पुरस्कृत मान्यवरांचा नागरी सत्कार समारंभ सिव्हिल लाईन येथील डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती सभागृहात रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी पार पडला. यावेळी मुख्य अतिथी म्हणून माजी सरन्यायाधीश भूषण गवई मार्गदर्शन करीत होते.
कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर, विशेष अतिथी म्हणून प्र-कुलगुरु डॉ. अखिलेश पेशवे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, सत्कार समिती अध्यक्ष तथा अधिसभा सदस्य ॲड. मनमोहन बाजपेयी, सदस्य मानव विज्ञान विद्या शाखा अधिष्ठाता डॉ. शामराव कोरेटी, आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. मंगला हिरवाडे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. उज्वला डांगे, व्यवस्थापन परिषद सदस्य सर्वश्री वामन तुर्के ,अजय अग्रवाल, डॉ. योगेश भुते, डॉ. देवेंद्र भोंगाडे, डॉ. नीलकंठ लंजे, डॉ. क्षितिजा कदम यांची उपस्थिती होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे प्रतिष्ठित आणि महान व्यक्तींमधील फरक समजावून सांगत सत्कार होत असलेल्या सेवाव्रत्तींच्या जीवनकार्यातून प्रेरणा घेत विद्यार्थ्यांनी समाज तसेच देशासाठी कार्य करावे, असे आवाहन माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले.
एकेकाळी, गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांची असलेली दहशत आपण सगळ्यांनी ऐकली आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पुढाकाराने नक्षलवादाचा बीमोड झाला आणि त्यातून आता गडचिरोलीचा विकास होतो आहे, असे माजी सरन्यायाधीश श्री. भूषण गवई म्हणाले. शंकर बाबा पापळकर यांच्या कार्याशी आम्ही लहानपणापासून जोडलो गेलो आहे. मेळघाटची आताची परिस्थिती खूप चांगली आहे. मात्र, २५ वर्षांपूर्वी तेथील स्थिती अत्यंत खडतर होती. अशा स्थितीत कोल्हे दांपत्याने तेथे आदिवासींसाठी काम केले आहे, असे न्या. गवई म्हणाले. त्यांनी इतरही सत्कारमूर्तींच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने आयोजित अभूतपूर्व अशा सोहळ्यासाठी उपस्थित राहता आले. याबाबत त्यांनी विद्यापीठ प्रशासन तसेच आयोजन समितीचे अभिनंदन करीत आभार मानले.‌ या सगळ्या सत्कारमूर्तींना पुढील काळातही चांगले काम करण्याची शक्ती लाभावी, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमात मागील पाच वर्षात पद्मश्री पुरस्कार प्राप्त
पद्मश्री श्री. शंकर बाबा पापळकर, पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे, पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे, पद्मश्री डॉ. चंद्रशेखर मेश्राम, पद्मश्री श्री. नामदेवराव कांबळे, पद्मश्री डॉ. धनंजय सगदेव, पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, पद्मश्री डॉ. विलास डांगरे, पद्मश्री श्री. सत्यनारायण नुवाल आणि पद्मश्री जनार्दन बोथे यांचा प्रमुख अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. श्री शंकर बाबा पापळकर यांचा पुरस्कार त्यांची मानसकन्या गांधारी यांनी स्वीकारला. श्री. सत्यनारायण नुवाल यांचा पुरस्कार त्यांचे नातू हर्ष नुवाल यांनी स्वीकारला. डॉ. धनंजय सगदेव यांचा पुरस्कार त्यांचे बंधू विंग कमांडर श्री. विनय सगदेव यांनी स्वीकारला.
*जीवनव्रतींचे कार्य नव्या पिढीला कळावे – डॉ. मनाली क्षीरसागर*
सर्व सत्कारमूर्तींनी एकदा हाती घेतलेले कार्य आयुष्यभर करण्याचे व्रत पाळले आणि त्यातूनच त्यांचा संकल्प तडीस गेला. अशा जीवनव्रतींचे कार्य नव्या पिढीला कळावे म्हणून आजचा सत्कार समारंभ आयोजित केला असल्याचे कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांनी सांगितले. त्यांनी सर्व सत्कारमूर्तींच्या कार्याचाही आपल्या भाषणातून गौरव केला. विद्यापीठ अंतर्गत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जीवनाचा मार्ग कळावा, त्यांना देखील सत्कारमूर्तींप्रमाणेच जीवनातील आपले ध्येय गाठता यावे. यासाठी विद्यापीठाने देखील राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरून आपल्या अभ्यासक्रमांमध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणला आहे. यासाठी आगामी शैक्षणिक सत्रापासून उद्योग आधारित, कौशल्यपूरक, रोजगार तसेच रोजगार निर्मितीच्या दिशेने अग्रेसर होणारे बारावीनंतर नाविन्यपूर्ण अप्रेंटिसशिप ऐम्बेडेड डिग्री प्रोग्राम (AEDP) अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना उद्योग भागीदारांसोबत इंटर्नशिप आणि अप्रेंटिसशिपची संधी मिळणार आहे. त्यामुळे शिक्षण घेत असतानाच प्रत्यक्ष उद्योगातील अनुभव, व्यावसायिक कौशल्ये आणि रोजगारक्षमता वाढविण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळेल, असे कुलगुरू म्हणाल्या.
सत्कार समिती सदस्य म्हणून डॉ. राजेश भोयर, डॉ. अजय अग्रवाल, डॉ. देवेंद्र भोंगाडे, डॉ. योगेश भुते, डॉ. अजय चव्हाण, डॉ. श्रीकांत भोवते, डॉ. चंदू पोपटकर,विष्णू चांगदे,दिनेश शेराम,सुनिल फुडके,राहुल हनवते यांनी कार्य सांभाळले. कार्यक्रमाचे संचालन आणि सत्कारमूर्तींचा परिचय डॉ. अमृता इंदूरकर यांनी केला. ॲड. मनमोहन बाजपेयी यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विद्यापीठाचे माजी कुलगुरू, माजी प्र-कुलगुरु, माजी कुलसचिव, विद्यापीठाच्या विविध प्राधिकार्यांचे सदस्य, शैक्षणिक विभागांचे प्रमुख, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच समाजातील अनेक मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते.