26.5 C
Gondiā
Wednesday, July 1, 2026
Home विदर्भ पोकलँडच्या बकेटमध्ये मुलांची ‘राईड’; व्हायरल व्हिडिओनंतर सुरक्षा नियमांवर प्रश्नचिन्ह

पोकलँडच्या बकेटमध्ये मुलांची ‘राईड’; व्हायरल व्हिडिओनंतर सुरक्षा नियमांवर प्रश्नचिन्ह

0
14

सडक अर्जुनी : गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातून एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तलावातील मुरूम उपसा सुरू असताना काही मुलांना मनोरंजनासाठी थेट पोकलँड मशीनच्या बकेटमध्ये बसवून हवेत फिरवण्यात आल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. या प्रकारामुळे जड यंत्रसामग्रीच्या वापराबाबत सुरक्षा नियमांचे पालन झाले का, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओनुसार, तलावातील मुरूम उत्खननाचे काम सुरू असताना काही मुलांना पोकलँड मशीनच्या बकेटमध्ये बसवून वर-खाली तसेच हवेत फिरवण्यात येत असल्याचे दिसते. मुलांना हा प्रकार मनोरंजनाचा वाटत असला, तरी अशा जड यंत्रसामग्रीचा वापर केवळ उत्खनन आणि बांधकामासाठी करण्यात येतो. अशा यंत्राच्या बकेटमध्ये व्यक्तींना, विशेषतः लहान मुलांना बसवणे कोणत्याही क्षणी गंभीर अपघातास कारणीभूत ठरू शकते, असे जाणकारांचे मत आहे.

या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष करून मुलांच्या जीवाशी खेळ करण्यात आल्याची भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावरही या प्रकाराबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.या प्रकरणाची संबंधित प्रशासन आणि यंत्रणांनी गंभीर दखल घेऊन व्हिडिओची सत्यता पडताळावी, सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाले आहे का याची चौकशी करावी आणि दोषींवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असला तरी या घटनेची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. प्रशासनाच्या चौकशीनंतरच या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.