27.9 C
Gondiā
Saturday, July 4, 2026
Home विदर्भ गोंदियातील चार तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद

गोंदियातील चार तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद

0
35

गोंदिया, दि. ४ – महिन्यात दडी मारलेल्या पावसाने जुलैच्या पहिल्याच आठवड्यात दमदार पुनरागमन करत जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. गुरुवारी (ता. २) मध्यरात्रीपासून सुरू झालेला मुसळधार पाऊस शुक्रवारी (ता. ३) दुपारपर्यंत कोसळल्यानंतर शनिवारी (ता. ४) दुपारपर्यंत विश्रांती घेत सायंकाळी पुन्हा काही भागांत जोरदार बरसला. या पावसामुळे गोंदिया, गोरेगाव, आमगाव आणि सालेकसा या चार तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली असून, जिल्ह्यातील शेतीकामांना मोठा वेग आला आहे.
जून महिन्यात अत्यल्प पावसामुळे धान पेरणी आणि रोवणीची कामे पूर्णपणे खोळंबली होती. जूनअखेर जिल्ह्यात केवळ ५३.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. हा पाऊस सरासरीच्या अवघ्या २७.५ टक्के असल्याने शेतकरी चिंतेत होते. जलसाठ्यांची पातळीही अपेक्षेप्रमाणे वाढली नव्हती. मात्र, जुलैच्या सुरवातीलाच पावसाने जोरदार हजेरी लावत शेतीला नवसंजीवनी दिली आहे.
सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी आधीच धान पेरणी पूर्ण केली होती. आता पावसामुळे शेतात पुरेसा ओलावा निर्माण झाल्याने रोवणीच्या कामांना वेग आला आहे. अनेक गावांमध्ये शेतमजुरांची लगबग वाढली असून, शेतकरी युद्धपातळीवर रोवणीची कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
मात्र, सलग झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे काही ठिकाणी पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांध फोडून अतिरिक्त पाण्याचा निचरा करताना दिसून आले. कमी उंचीच्या शेतांमध्ये पाणी साचल्याने शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे.
शनिवारी झालेल्या पावसात गोंदिया तालुक्यात ९२.३ मि.मी., गोरेगाव ९३.२ मि.मी., आमगाव ८७.५ मि.मी., तर सालेकसा तालुक्यात ९२.२ मि.मी. पावसाची नोंद झाली. या चार तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय तिरोडा तालुक्यात १७.० मि.मी., देवरी २२.१ मि.मी., सडक अर्जुनी ३१.३ मि. मी., तर अर्जुनी मोरगाव तालुक्यात केवळ ०.६ मि.मी. पाऊस झाला.
दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही दिवस जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे नदी-नाल्यांच्या परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

पुजारीटोला धरणाचे चार गेट उघडले
जिल्ह्यातील पुजारीटोला धरणाचे चार गेट ०.३० मीटरने उघडण्यात आले आहे. नदीपात्रात ८६ घनमीटर प्रतिसेकंद (क्युमेक्स) विसर्ग सुरू आहे.