देवरी:नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्ग ५३ वरील देवरी शहर आणि आसपासच्या परिसरात रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. महामार्गावर ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे हा राष्ट्रीय महामार्ग आहे की एखादा ग्रामीण रस्ता, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या होत असलेल्या पावसामुळे या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून, वाहनचालकांना खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज येत नाही
देवरी हा सीमावर्ती भाग असल्याने येथून दररोज हजारो लहान-मोठी आणि अवजड वाहने प्रवास करतात. या जीवघेण्या खड्ड्यांमुळे दररोज छोटे-मोठे अपघात घडत असून वाहनचालकांना पाठीचे आणि मणक्याचे आजार जडत आहेत. रात्रीच्या वेळी तर हा मार्ग चालकांसाठी मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. टोल प्रशासनाकडून नियमित टोल वसुली केली जाते, परंतु रस्त्यांच्या देखभालीकडे आणि दुरुस्तीकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) व संबंधित कंत्राटदाराचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.





