गोरेगाव, ता. 10: तालुक्यातील बोरगाव ते सुखपूर या गावी आवागमन करण्याकरिता गुमडोह कालव्याच्या पाळीवरून दळणवळण रस्ता आहे. या रस्त्यावर मातोश्री शेतपांदण रस्ता बांधकाम केला जात आहे. हे बांधकाम अर्धवट असल्याने गावकऱ्यांना आवागमन करता येत नाही. गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाअंतर्गत गुमडोह तलावाचे पाणी कालव्याद्वारे सुखपूर, बोरगाव, नवरगाव, बाघोली, चोपनटोली, डोंगरूटोला या गावांतील शेतीला वाटप करण्यात येते. हे पाणी वाटप सुरळीतपणे करता यावे म्हणून २००५ ला पाणी वाटप समिती तयार करण्यात आली असून ही समिती कालव्यातून पाणीपुरवठा करत आहे. याच कालव्यावरून सुखपूर, बोरगाव व इतर गावांतील नागरिकांना सुखपूर येथे जाण्या-येण्याकरिता दळणवळण रस्ता आहे. या रस्त्यावर मातोश्री शेतपांदण रस्ता बांधकाम मंजूर करण्यात आला. हे बांधकाम सुरू करता यावे म्हणून पाणीपुरवठा समिती व काही गावकऱ्यांनी जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाकडे रस्ता बांधकाम करण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्राची मागणी केली. ही मागणी लघु पाटबंधारे विभागाने मंजूर करून प्रमाणपत्र दिल्याने मातोश्री शेतपांदणचे बांधकाम दळणवळण रस्त्यावर कंत्राटदारांनी सुरू केले आहे.
शेतकऱ्यांना शेतात सहज जाता यावे, शेतमाल बाजारपेठेपर्यंत पोहचविण्यास सुलभ व्हावे, या उद्देशाने शासनाने मातोश्री शेतपांदण रस्ते बांधकामास सुरवात केली आहे. तरीसुद्धा शेतपांदण रस्त्याचे बांधकाम कालव्यावरून असलेल्या दळणवळण रस्त्यावर केले जात आहे. त्यामुळे हा विषय चर्चेचा ठरत आहे.
रस्ता बांधकामाची चौकशी व्हावी
शासनाने बोरगाव ते सुखपूर कालवा दळणवळण रस्त्याच्या बांधकामाची चौकशी करून योग्य शेतपांदण रस्त्यावर नव्याने मातोश्री शेतपांदण रस्ता बांधकाम मंजूर करावा व शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे.
मंजुरीचे पत्र अद्याप जारी केलेले नाही
मंजुरीसाठी विनंती प्राप्त झाली आहे. तथापि, काही त्रुटींमुळे या टप्प्यावर मंजुरीचे पत्र जारी करण्यात आलेले नाही.
– राजीव कुरेकर, कार्यकारी अभियंता, गोंदिया लघु सिंचन विभाग




