31 C
Gondiā
Wednesday, July 15, 2026
Home विदर्भ वृक्ष लावणे ही केवळ मोहीम नव्हे, तर भावी पिढीच्या सुरक्षित भविष्याची जबाबदारी–...

वृक्ष लावणे ही केवळ मोहीम नव्हे, तर भावी पिढीच्या सुरक्षित भविष्याची जबाबदारी– आमदार राजकुमार बडोले

0
12

अर्जुनी-मोर.-वनविभाग, गोंदिया अंतर्गत वनपरिक्षेत्र अर्जुनी-मोरगाव यांच्या वतीने वनमहोत्सव “एक पेड माँ के नाम – हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र” अभियानांतर्गत नियतक्षेत्र माहूरकुडा, कक्ष क्र. ३२८ येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या अभियानांतर्गत विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे आमदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आलेले वृक्षारोपण. यावेळी बोलताना आमदार बडोले म्हणाले की, “वृक्ष लावणे ही केवळ एक दिवसाची मोहीम नसून भावी पिढीच्या सुरक्षित आणि समृद्ध भविष्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वीकारायची सामाजिक जबाबदारी आहे. ‘एक पेड माँ के नाम’ ही संकल्पना आपल्या आईप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच निसर्गाविषयीची आपली बांधिलकी अधोरेखित करणारी आहे. प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन केल्यास हरित महाराष्ट्राचे स्वप्न निश्चितच साकार होईल.” त्यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षसंवर्धनाला लोकचळवळीचे स्वरूप देण्याचे आवाहनही केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनीही वृक्षसंवर्धनाची शपथ घेत पर्यावरण संरक्षणासाठी सामूहिक सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमात वृक्ष लागवडीसोबतच त्यांचे नियमित संगोपन करण्याचा संकल्प सर्वांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, विभागीय वन अधिकारी, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प अतुल देवकर, प्रभारी निवासी अधिकारी नवेगाव बांध अविनाश मेश्राम, वनपरिक्षेत्र अधिकारी अर्जुनी-मोरगाव बहुरे साहेब, माजी उपसभापती पंचायत समिती होमराज पुस्तोडे, जिल्हा परिषद सदस्य यशवंत गणवीर, पंचायत समिती सदस्य नूतन सोनवणे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष भोजूजी लोगडे, ग्रामपंचायत सदस्य साखरेजी (महागाव), कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लोकपाल गहाणे, विनोद डोंगरवार, सिरोलीचे सरपंच नाजूकजी लसून्ते, मंगेश भलावी, अजय शहारे, पोलीस पाटील हंशराज गोटेफोडे, पोलीस पाटील हेमलताताई देशमुख, वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी, ग्रामस्थ तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमामुळे पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती झाली असून “हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र” या संकल्पनेला बळकटी देण्याचा महत्त्वपूर्ण संदेश या उपक्रमातून देण्यात आला.