चंद्रपुर(प्रतिनिधी) दि. १५ जुलै :राज्य शासनाच्या प्लास्टिक कचरा निर्मूलन अभियानांतर्गत आज पंचायत समिती भद्रावतीच्या वतीने ग्रामपंचायत पारोधी येथे “प्लास्टिक कचरा संकलन – एक दिवस श्रमदान” या तालुकास्तरीय मोहिमेचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला.
या मोहिमेचे नेतृत्व पंचायत समिती भद्रावती चे गट विकास अधिकारी आशुतोष सपकाळ यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सहाय्यक गटविकास अधिकारी डॉ. बंडु आकुनरवार यांनी भूषविले. यावेळी ग्रामपंचायत परिसरासह गावातील सार्वजनिक ठिकाणी प्लास्टिक कचरा संकलन करून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. नागरिकांना एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा वापर टाळण्याचे तसेच पर्यावरणपूरक सवयी अंगीकारण्याचे आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमास गणेश उमरे (ग्रामपंचायत अधिकारी), नागपुरे मॅडम (उमेद विभाग), बचत गटातील महिला, आशा सेविका, शिक्षक, विद्यार्थी, गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच बीआरसी श्रीराम थूल यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वांनी श्रमदानात सक्रिय सहभाग नोंदवून प्लास्टिकमुक्त व स्वच्छ गाव उभारण्याचा निर्धार व्यक्त केला. या उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये प्लास्टिक कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती निर्माण झाली असून भविष्यातही अशा उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले.





