गोंदिया, दि.16 : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्ह्यात पावसाळ्यात किटकजन्य व जलजन्य आजाराबाबरात जनजागृती करण्यात येत आहे. डेंग्यू प्रतिबंधात्मक जुलै महिना अनुषंगाने जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय व आश्रमशाळेत आरोग्य विभागामार्फत किटकजन्य आजाराबाबत जनजागृती करण्यात येत आहे. दि.14 जुलै 2026 रोजी गोरेगाव तालुक्यातील जी.ई.एस. माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत किटकजन्य व जलजन्य आजारावर मार्गदर्शन कार्यशाळा घेऊन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली.
किटकशास्त्रज्ञ सुभाष बिसेन यांनी गोरेगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कवलेवाडा अंतर्गत जी.ई.एस.माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना बॅनरच्या माध्यमातुन डासांचे प्रकार व त्यापासुन होणारे आजार, त्यांचे लक्षणे आणि डासांचे जीवनचक्र अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगितले. विद्यार्थ्यांना अॅनोफिलीस मादी, एडीस आणि क्युलेक्स इत्यादी किटक ओळखण्यासंबंधी माहिती देण्यात आली. हिवताप आजाराबाबत्त डासांचे जीवनचक्र, पाण्यात डासांची होणारी वाढ, डासामध्ये प्लासमोडीयम जंतुची वाढ व हिवताप जंतु भारीत परिपक्व प्रौढ डास मानवाला चावल्यानंतर मानवाच्या रक्तात व अवयवात आढळणारे बदल, किटकशास्त्रीय सर्वेक्षण, हिवताप नियंत्रणासाठी लार्वा व प्रौढ डास यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना याबाबत विस्तृत माहिती उपस्थितांना देण्यात आली.
सदर कार्यक्रमात गोरेगाव तालुका किटकशास्त्रज्ञ सुभाष बिसेन यांनी संसर्गजन्य रोग तसेच किटकजन्य आजार यांचा प्रसार व प्रतिबंधात्मक उपाययोजना व लोकसहकार्याची गरज यावर प्रशिक्षण दिले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देवुन त्यांच्या विविध शंकांचे निरसन केले.आरोग्य शिक्षण कार्यक्रम उपक्रम यशस्वी होण्यासाठी प्राचार्य वी.बी.भिवगडे, केंद्रप्रमुख, शिक्षकवृंद तसेच आरोग्य विभागामार्फत आरोग्य निरिक्षक, आरोग्य सहाय्यक महेश वाघमारे, सामुदायिक आरोग्य अधिकारी हरिणखेडे, आरोग्य सेवक रामटेके, आरोग्य सेविका व आशा सेविका उपस्थित होते.





