गोंदिया-गोंदिया शिक्षण संस्थेद्वारे संचलित नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालय, डी. बी. सायन्स महाविद्यालय, एस. एस. गर्ल्स महाविद्यालय व पी. पी. एज्युकेशन महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नवनिर्वाचित खासदार तथा गोंदिया शिक्षण संस्थेचे सचिव राजेंद्र जैन यांचा कौटुंबिक सत्कार समारंभ एन. एम. डी. महाविद्यालयाच्या अत्याधुनिक सभागृहात उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सत्कारमूर्ती खासदार राजेंद्र जैन होते. प्रमुख अतिथी म्हणून देवेंद्रनाथ चौबे उपस्थित होते. प्रमुख उपस्थितीत प्राचार्य डॉ. रवींद्र मोहतुरे, प्राचार्य डॉ. मनोज पटले, प्राचार्या डॉ. शारदा महाजन व प्राचार्य डॉ. राजेंद्र निकोसे उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात शिक्षणमहर्षी स्व. मनोहरभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन व शारदास्तवनाने करण्यात आली.
सत्कार सोहळ्यात बोलतांना खासदार राजेंद्र जैन म्हणाले की, “एन. एम. डी. महाविद्यालयात इयत्ता अकरावीचा विद्यार्थी म्हणून शिक्षण घेण्याचे भाग्य मला लाभले. आज त्याच महाविद्यालयात माझा सत्कार होत असल्याने हा माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि भावनिक क्षण आहे.” ते पुढे म्हणाले की, शिक्षा महर्षी स्व.मनोहरभाई पटेल यांचे राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक कार्य माझ्यासाठी नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे. खासदार प्रफुल पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रामाणिकपणा, एकनिष्ठा आणि अथक परिश्रमाने कार्य करत आलो असून, “एकनिष्ठा आणि मेहनत हेच माझ्या यशाचे खरे गमक आहे,” असे त्यांनी सांगितले.गोंदिया शिक्षण संस्थेतील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी विद्यार्थ्यांकडे स्वतःच्या मुलांप्रमाणे पाहून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचे आवाहन केले.
प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. रवींद्र मोहतुरे यांनी राजेंद्र जैन यांच्या कार्याचा आढावा घेतला. प्राचार्या डॉ. शारदा महाजन यांनी आपल्या मनोगतात राजेंद्रजी जैन यांचे यश संपूर्ण गोंदिया शिक्षण संस्था परिवारासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगून, राष्ट्रीय राजकारणात त्यांना अधिक यश लाभावे, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मोहम्मद एजाज शेख यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्राचार्य डॉ. मनोज पटले यांनी केले.या कार्यक्रमास महाविद्यालयांतील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) व राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी)चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





