26.5 C
Gondiā
Monday, July 20, 2026
Home विदर्भ आषाढी वारीच्या सेवेसाठी जिल्ह्यातून प्रथमच आपत्ती व्यवस्थापन बचाव पथक रवाना

आषाढी वारीच्या सेवेसाठी जिल्ह्यातून प्रथमच आपत्ती व्यवस्थापन बचाव पथक रवाना

0
14
वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा प्रशासनाचा पुढाकार
 पंढरपुरात बजावणार सेवाभावी जबाबदारी
वाशिम, दि. २० जुलै  : पंढरपूरच्या आषाढी वारीनिमित्त लाखो वारकरी आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी व आपत्कालीन मदतीसाठी जिल्ह्यातून प्रथमच आपत्ती व्यवस्थापन बचाव पथक रवाना करण्यात आले आहे. स्वामी विवेकानंद आपत्ती व्यवस्थापन बचाव पथक आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला असून, जिल्ह्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वपूर्ण आणि अभिमानास्पद उपक्रम ठरला आहे.
वाशिम-मंगरुळपीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्याम खोडे, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर आणि पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच किशोर देशमुख आणि सचिन राणे यांच्या समन्वयातून हे पथक पंढरपूरकडे रवाना झाले आहे.आषाढी वारीदरम्यान उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत तातडीची मदत, बचावकार्य, गर्दीचे व्यवस्थापन, हरविलेल्या व्यक्तींना मदत तसेच आवश्यक आपत्कालीन सेवा पुरविण्याची जबाबदारी हे पथक पार पाडणार आहे.
पथकाच्या प्रस्थानापूर्वी मंगरुळपीर येथे आमदार श्याम खोडे आणि जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते नारळ फोडून पथकाला शुभेच्छा देत रवाना करण्यात आले. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत, संबंधित विभागांचे अधिकारी, बचाव पथकाचे सदस्य तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.याप्रसंगी पथकातील सदस्यांना सेवाभाव, शिस्त आणि तत्परतेने कार्य करून वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी मोलाचे योगदान देण्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
दरम्यान, शेलूबाजार आणि मंगरुळपीर येथेही बचाव पथकातील सदस्यांचा सत्कार करण्यात आला. आषाढी वारीसाठी प्रथमच वाशिम जिल्ह्यातून आपत्ती व्यवस्थापन बचाव पथक सेवेसाठी रवाना झाल्याने या उपक्रमाचे विविध स्तरांतून स्वागत होत असून, भाविकांच्या सेवेसाठी जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या या पुढाकाराचे नागरिकांकडूनही विशेष कौतुक करण्यात येत आहे.पथकातील सदस्यांना पंढरपूर येथे जाण्यासाठी कारंजा येथील गुरु मंदिर संस्थांच्या वतीने ऍम्ब्युलन्स मोफत उपलब्ध करून देण्यात आली.

blank