25.1 C
Gondiā
Friday, August 14, 2026
Home विदर्भ प्रगत शेतीसाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा अवलंब आवश्यक-पालकमंत्री दत्तात्रय भरणे 

प्रगत शेतीसाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा अवलंब आवश्यक-पालकमंत्री दत्तात्रय भरणे 

0
12

रानभाजी महोत्सव व फार्मर ग्रुप लीगचा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात 

वाशिम, दि. १४ ऑगस्ट – मानवी जीवनात रानभाज्यांना अनन्यसाधारण महत्त्व असून त्यांचे आरोग्यदायी फायदे मोठे आहेत. हवामान बदलामुळे शेतीचे नुकसान होत असल्याने बदलत्या परिस्थितीनुसार शेतकऱ्यांनी शेती पद्धतीत बदल करून आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणीव असून शासन शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांनी दिली.
कृषी विभागाच्या वतीने आयोजित रानभाजी महोत्सव व फार्मर ग्रुप लीग स्पर्धा २०२६च्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी खासदार संजय देशमुख, आमदार सईताई डाहाके, कृषी सहसंचालक घोरपडे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री ना. भरणे म्हणाले, जिल्ह्यातील शेतकरी शेतामध्ये विविध प्रयोग करीत असून आधुनिक तंत्रज्ञान शेतीमध्ये उतरवत आहेत. रासायनिक खतांना पर्याय म्हणून नैसर्गिक खतांचा वापर करण्याकडेही शेतकरी वळत आहेत. रानभाजी महोत्सव व फार्मर ग्रुप लीगच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळत असून यामध्ये ७६५ शेतकरी गटांनी सहभाग नोंदविला, ही बाब कौतुकास्पद आहे.
हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतीची पद्धत बदलणे गरजेचे आहे. शेतकरी हा केंद्रबिंदू मानून त्याच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन विविध उपाययोजना राबवत आहे. शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासोबतच कृषी विभागानेही त्यांना आवश्यक ते सहकार्य करावे. शासन शेतकऱ्यांच्या कायम पाठीशी राहील, असेही त्यांनी सांगितले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा मोठा लाभ
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा लाभ झाला असून  वीजबिलात सवलतीसह शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन विविध निर्णय घेत आहे. शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी योजनांचा प्रभावी लाभ मिळवून देण्यावर भर देण्यात येत आहे. जिल्ह्याची विकसनशील जिल्हा अशी नवी ओळख निर्माण करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन पालकमंत्री ना. भरणे यांनी केले.
खासदार संजय देशमुख यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. शेतकरी गटांनी एकत्रितपणे काम करून आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा आणि शेतीतील नवनवीन प्रयोगांना प्रोत्साहन द्यावे, असे त्यांनी सांगितले.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शहा यांनी प्रास्ताविक केले. प्रकल्प संचालक अनिसा महाबळे यांनी संचालन केले. यावेळी जिल्हास्तरीय १० गटांना पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यामध्ये मंगरुळपीर तालुक्यातील शेलूबाजार येथील सतीआई गटाचा समावेश आहे. कारंजा तालुक्यातील बेंबळा येथील युवा शेतकरी उद्योजक समूह आणि दोनद (बु.) येथील बलराम शेतकरी गट यांनीही या यादीत स्थान मिळविले आहे. मानोरा तालुक्यातील कुपटा येथील बळीराजा शेतकरी गट तसेच खेरडा येथील बळीराजा शेतकरी महिला गट यांचा समावेश आहे. वाशिम तालुक्यातील सुपखेला येथील बळीराजा महिला शेतकरी गट, वरला येथील जय बाळूमामागट आणि वाई येथील नंदकिशोर नैसर्गिक गट यांनीही जिल्हास्तरीय टॉप १० मध्ये स्थान मिळविले आहे. रिसोड तालुक्यातील घोटा येथील संगमेश्वर शेतकरी उत्पादक गट आणि कवठा खु. येथील प्रधानमंत्री सेंद्रिय शेतकरी गट यांचाही समावेश आहे. तसेच चिया पीक पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले.
रानभाजी महोत्सवातील विविध स्टॉलची पाहणी
रानभाजी महोत्सवात शेतकरी व शेतकरी गटांनी उभारलेल्या जवळपास ३० स्टॉलला पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांनी भेट देऊन पाहणी केली. या स्टॉलवर सादर करण्यात आलेल्या सुमारे ३० विविध रानभाज्यांची त्यांनी माहिती घेतली. रानभाज्यांचे महत्त्व, त्यांची उपलब्धता, पौष्टिकता तसेच शेतकऱ्यांना त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या संधींबाबत त्यांनी शेतकरी गटांशी संवाद साधला.कार्यक्रमास लोकप्रतिनिधी,शेतकरी, शेतकरी गटांचे सदस्य, कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच पत्रकार ,नागरिक आदी  उपस्थित होते.