28 C
Gondiā
Friday, August 21, 2026
Home विदर्भ नवेगाव बांध येथे ना.सावंत यांच्या हस्ते ‘पुस्तकांच्या गावाचे’ लोकार्पण

नवेगाव बांध येथे ना.सावंत यांच्या हस्ते ‘पुस्तकांच्या गावाचे’ लोकार्पण

0
36

गोंदिया,२१- निसर्ग पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध गावाने आता आणखी एक मानाचा तुरा आपल्या शिरपेचात रोवला आहे. नवेगाव बांध येथे ‘पुस्तकांच्या गावाचे’ लोकार्पण आणि पुस्तक दालनाच्या शुभारंभाचा सोहळा उत्साहात पार पडला.

निसर्ग पर्यटनासाठी ओळखल्या जाणाऱ्या नवेगाव बांधची ओळख आता ‘पुस्तकांचे गाव’ म्हणूनही निर्माण झाली आहे. पर्यटनासोबतच वाचन संस्कृतीला चालना देणाऱ्या या उपक्रमामुळे गावातील विद्यार्थ्यांसह नागरिकांसाठी ज्ञानाची नवी दारे खुली झाली आहेत. निसर्गाच्या सान्निध्यात आता पुस्तकांचीही साथ… वाचन संस्कृतीचा नवा अध्याय सुरू करत नवेगाव बांधने ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून नवी ओळख निर्माण केली आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती, नवेगाव बांध येथे आयोजित कार्यक्रमात उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सावंत यांच्या हस्ते पुस्तकांच्या गावाचे उद्घाटन करण्यात आले. अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले, जिल्हाधिकारी मंदार पत्की तसेच यांची प्रमुख उपस्थिती होती.

गावामध्ये वाचन संस्कृती रुजवण्यासाठी एका वाचन दालनाचे यावेळी उद्घाटन झाले असून अजून 9 वाचन दालने तयार होत आहेत. नागरिक आणि विद्यार्थ्यांना, पर्यटकांना पुस्तकांशी जोडण्याचा हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला आहे. राज्यातील निवडक गावांपैकी तीन गावांना ‘पुस्तकांचे गाव’ हा उपक्रम मिळाला असून, नागपूर विभागातील पहिल्या गावाचा मान गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांधला मिळाला आहे.