डेंग्यू-मलेरियाला हरवायचे आहे, साचलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडायचे आहे--डॉ.विनोद चव्हाण, जिल्हा हिवताप अधिकारी
गोंदिया,दि.२६- जिल्ह्यात पावसाळ्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे.सर्वच गावांमध्ये पावसाचे पाणी जमा झालेले आहे.नाल्या,गटारे तुंबलेले आहे.झाडे,झुडपी व गवत साचलेल्या पाण्यात वाढलेले आहे.राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जिल्हयात किटकजन्य आजार जसे हिवताप,डेंग्यू,चिकनगुनिया,चंडीपुरा,जे.ई.व हत्तीरोग इत्यादी आजाराबाबत वाढते प्रमाण लक्षात घेता जिल्हा आरोग्य प्रशासनाने जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण यांच्या संकल्पनेतून दि.24 ते 28 ऑगस्ट दरम्यान शहरात व ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणार्या कार्यक्षेत्रातील गावोगावी जीवशास्त्रीय उपाययोजना करण्याचे नियोजन केले आहे.”माझे गाव आरोग्य संपन्न गाव”साठी गप्पी मासे सोड मोहीम लोकसहभागातुन चळवळ निर्माण करण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार यांनी गोंदियावासियांना केले आहे.
साचलेल्या पाण्यातील डासांच्या अळ्या (डिंबक) नष्ट करणे आणि हिवताप,डेंग्यू, चिकनगुनिया,चंडीपुरा,जे.ई.व हत्तीरोग इत्यादी आजारावर नियंत्रण मिळवणे हेच ह्या मोहीमेचे उद्दिष्ट्य असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार यांनी माहीती दिली आहे.
शहरी भागांत डेंग्यू, मलेरिया (हिवताप) व चिकनगुनिया यांसारख्या आजारांना कारणीभूत ठरणारऱ्या डासांच्या अळ्या नष्ट करण्यासाठी आरोग्य व हिवताप प्रशासनाकडून ‘गप्पी मासे मोहीम‘ राबवली जात असल्याचे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण यांनी माहीती दिली आहे.
शहरातील वाढत्या डासांच्या व कीटकजन्य आजारांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ही मोहीम हाती घेऊन विविध वार्ड व प्रभागांमधील पाणी साचलेल्या भागात व हौदांमध्ये हे मासे सोडण्यास सुरुवात केली आहे.
आरोग्य विभागातील आरोग्य कर्मचारी त्यात जितू भैसारे,अंकुश बिसेन,विशाल लिल्हारे,निशांत आप्तुरकर,आकाश निकुसे,राकेश शेंडे,भालचंद्र मेश्राम,सोनल सावरकर,सुनील भांडारकर,सागर शिंगाडे व नागदेवे ह्या आरोग्य कर्मचारी यांनी काल पासुन सुरु झालेल्या गप्पी मासे सोड मोहिमेत वाजपेयी वॉर्ड,श्रीनगर,सबजी मंडी मार्केट,शिवाजी नगर,छोटा गोंदीया,संजय नगर, मामा चौक व ईंगळे चौक भागातील विविध नगर व वार्डातील विविध डासोत्पती ठिकांणामध्ये गप्पी मासे सोडले असल्याची माहीती हिवताप विभागाने दिली आहे
पावसाळ्याच्या दिवसात पसरणाऱ्या डेंग्यू हिवताप, हत्तीरोग व चिकनगुनिया या किटकजन्य आजारांवर प्रतिबंध घालण्यासाठी गप्पी मासे सोडण्याची धडक मोहीम हाती घेतली आहे. पावसाळ्यातील साथरोग तसेच ताप सर्वेक्षण,कंटेनर सर्वेक्षण, रक्त नमुने,वेंट पाईपला जाळी किंवा कापड बांधणे आदी उपक्रम गोंदिया शहरात राबविण्यात येत आहेत.
गप्पी मासे पाण्यावर तरंगणाऱ्या डासांच्या अळ्या खाऊन जगतात,ज्यामुळे रासायनिक औषधांशिवाय नैसर्गिकरीत्या डासांची उत्पत्ती थांबते.
गप्पी मासे सोड मोहीम जनजागरण माहिमेमध्ये गाव तसेच शहर पातळीवर डासोत्पत्ती स्थानामध्ये गप्पी मासे सोडून गप्पी माशांचे कीटकजन्य आजार नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने त्याचे महत्व व प्रात्यक्षीक आरोग्य विभागामार्फत जनतेला पटवून देणे,डासोत्पत्ती स्थाने नष्ट करणे,खड्ड्यांमध्ये माती टाकणे,नाली वाहती करणे, कोरडा दिवस पाळणे, नेहमी पाणी जमा राहत असेल अशा ठिकाणी गप्पी मासे सोडणे,आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत डास अळी सर्वेक्षण,जलदताप सर्वेक्षण,अॅबेटिंग,संडासच्या व्हेंट पाईपला जाळी बसवणे,तसेच प्रतिबंधात्मक उपाय योजना विषयी आरोग्य शिक्षण देणे,गट सभा घेणे इत्यादी विविध अशा उपाययोजना करण्याचे आवाहन या मोहिमेमध्ये करण्यात आले असल्याचे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण यांनी केले आहे.लोकसहभागातुन हा दिवस साजरा करण्याचा नाविन्यपुर्वक उपक्रम राबविल्यास हिवतापाचा प्रादुर्भाव कमी होण्यास निश्चितच मदत होणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार यांनी म्हटले आहे.यासाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेले गप्पी मासे पैदास केंद्रात असलेले गप्पी मासे वितरण करण्यात येत आहे.
गप्पी मासे मोहिमेची ठळक वैशिष्ट्ये:
- जैविक नियंत्रण (Biological Control): रासायनिक फवारणीऐवजी पर्यावरणाला व आरोग्याला घातक नसलेला हा एक नैसर्गिक उपाय आहे.एक गप्पी मासा दिवसाला जवळपास १०० पेक्षा जास्त डासांच्या अळ्या खातो.
- पाण्यात सोडले जातात: आरोग्य विभागाचे कर्मचारी शहरातील साचलेले पाणी,न वापरणार्या विहिरी,बंदिस्त हौद,पाण्याचे तुंबलेले खड्डे, आणि डबक्यांमध्ये हे गप्पी मासे सोडतात.
- मोफत पैदास व वाटप: आरोग्य विभागाच्या माध्यमातून गप्पी माशांचे प्रजनन करून ते डासोत्पती स्थानंकामध्ये सोडण्याचे मोफत उपलब्ध करून दिले जातात.





