23 C
Gondiā
Thursday, September 3, 2026
Home विदर्भ धानाला बोनस मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार : आमदार राजकुमार बडोले

धानाला बोनस मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार : आमदार राजकुमार बडोले

0
51

रोगराई, अल्प पाऊस आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकरी संकटात
अर्जुनी-मोर. -यावर्षी धान पिकाची परिस्थिती अत्यंत चिंताजनक असून, अल्प पाऊस आणि विविध रोगराईच्या प्रादुर्भावामुळे धान उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. धान पिकावर कडी, करपा, गाबेमार तसेच लष्करी अळी यांसारख्या रोग-किडींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांना वारंवार कीटकनाशकांची फवारणी करावी लागत आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली असून, अपेक्षित उत्पन्नाच्या तुलनेत यंदा धान शेती तोट्याची ठरण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर धानाला शासनाने बोनस जाहीर करावा, अशी मागणी घेऊन शेतकरी आमदार ईंजी. राजकुमार बडोले यांच्या जनसंपर्क कार्यालयात येत आहेत. शेतकऱ्यांच्या या मागणीची दखल घेत धानाला बोनस मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर ठोस प्रयत्न करणार असल्याचे आमदार राजकुमार बडोले यांनी सांगितले.
याबाबत पत्रकारांशी बोलताना आमदार बडोले म्हणाले की, अर्जुनी-मोर विधानसभा क्षेत्रासह पूर्व विदर्भात यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने धान पिकावर मोठ्या प्रमाणात रोगराईचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला असून, त्यांना आर्थिक दिलासा देणे गरजेचे आहे.
नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत धानाला बोनस देण्याच्या विषयावर सुमारे अर्धा तास चर्चा केली. या चर्चेत आमदार राजकुमार बडोले यांच्यासह अन्य आमदारांनीही धान बोनसच्या मागणीसंदर्भात आपली भूमिका मांडली होती. त्यावेळी मुख्यमंत्री आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांनी धानाला बोनस देण्याबाबत शासन सकारात्मक विचार करीत असल्याचे आश्वासन दिले होते.
शेतकऱ्यांना सध्या आर्थिक मदतीची नितांत गरज असून, धानाला योग्य दरासोबतच बोनस मिळाल्यास त्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. त्यामुळे शासनाकडील आर्थिक व तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर आपण स्वतः मुख्यमंत्री, कृषिमंत्री तसेच अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांची भेट घेऊन निवेदन सादर करणार आहोत. शेतकऱ्यांच्या भावना, त्यांच्या अडचणी आणि वाढता उत्पादन खर्च शासनाच्या निदर्शनास आणून देत धानाला बोनस देण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार, अशी ग्वाही आमदार राजकुमार बडोले यांनी दिली.
धान उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेऊन शासनाने यंदा बोनस जाहीर करावा, अशी अपेक्षा परिसरातील शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.