गोंदिया। योग वेदांत आश्रम, गोंदिया येथे दिनांक 2 सप्टेंबर 2026 रोजी श्रद्धा व भक्तिमय वातावरणात गीता-भागवत सत्संग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. परमपूज्य गुरुदेवजींचे कृपापात्र शिष्य श्री रामा भाईजी यांच्या सान्निध्यात गोंदिया येथील साधक बंधू-भगिनी तसेच गुरुकुलातील विद्यार्थ्यांनी सत्संगाचा लाभ घेतला.
सत्संगादरम्यान श्री रामा भाईजी यांनी साधकांना जीवन सकारात्मक, शिस्तबद्ध व सार्थक करण्यासाठी विविध जीवनोपयोगी विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच गुरुकुलातील विद्यार्थ्यांना आई-वडिलांचा सन्मान, बुद्धीच्या विकासाचे उपाय, सदाचार तसेच भारतीय सनातन संस्कृतीतील संस्कार व मूल्ये याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी आपल्या गौरवशाली सनातन संस्कृतीशी जोडलेले राहावे, संस्कारक्षम जीवन जगावे तसेच आई-वडील व गुरुजनांचा आदर करावा, असा संदेश देण्यात आला. सत्संगाच्या माध्यमातून उपस्थित साधक व विद्यार्थ्यांना आध्यात्मिक ज्ञानासोबतच दैनंदिन जीवनात उपयोगी ठरणारे संस्कार आणि सकारात्मक विचार मिळाले.यावेळी श्री योग वेदांत सेवा समिती, गोंदिया यांच्या वतीने श्री रामा भाईजी यांचा हार्दिक सत्कार व स्वागत करण्यात आले. साधक बंधू-भगिनी आणि गुरुकुलातील विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आश्रम परिसर भक्तिमय व आध्यात्मिक वातावरणाने भारावून गेला होता.श्री योग वेदांत सेवा समिती, गोंदिया यांनी सांगितले की, अशा सत्संग व संस्कारमय कार्यक्रमांचा मुख्य उद्देश समाजात आध्यात्मिक जागृती, सदाचार तसेच भारतीय सनातन संस्कृतीतील संस्कार व मूल्यांना प्रोत्साहन देणे हा आहे.





