23.6 C
Gondiā
Friday, September 4, 2026
Home विदर्भ खासदार प्रतिभा धानोरकर आक्रमक!’सरप्राईज व्हिजिट’मध्ये वाहतूक पोलिसांचे पितळ उघडे

खासदार प्रतिभा धानोरकर आक्रमक!’सरप्राईज व्हिजिट’मध्ये वाहतूक पोलिसांचे पितळ उघडे

0
54

बेजबाबदार अधिकाऱ्यांना ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश; थेट रस्त्यावर उतरून ट्रॅव्हल्सवर धडक कारवाई

चंद्रपूर (विशेष प्रतिनिधी):जिल्ह्यातील अत्यंत संवेदनशील आणि गंभीर बनलेल्या रस्ता सुरक्षेच्या प्रश्नावर प्रशासनाचा अती-बेजबाबदारपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आज आयोजित रस्ता सुरक्षा समितीच्या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीला उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यासह अनेक प्रमुख विभाग प्रमुखांनीच दांडी मारल्याने, खासदार प्रतिभा धानोरकर यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत ही बैठक तात्काळ रद्द केली. लोकप्रतिनिधींचा आणि प्रशासकीय शिस्तीचा अनादर करणाऱ्या या सर्व दांडीबहाद्दर अधिकाऱ्यांना त्वरित ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावण्याचे कडक आदेश त्यांनी समितीच्या सचिव तथा जिल्हाधिकारी वसुमना पंत यांना दिले आहेत. या प्रसंगी विधान परिषद आमदार सुधाकर अडबाले यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

रस्त्यावर उतरताच प्रशासनाची पळापळ!

बैठक रद्द केल्यानंतर खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आक्रमक भूमिका घेत थेट शहराच्या मुख्य रस्त्यांवर उतरून पाहणी सुरु केली. रस्त्यावर अस्ताव्यस्त उभ्या राहणाऱ्या आणि वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सवर त्यांनी तात्काळ कारवाईचे निर्देश दिले. खासदार स्वतः रस्त्यावर उतरल्याचे दिसताच पोलीस आणि आरटीओ प्रशासनाची प्रचंड धावपळ उडाली व घाईघाईत ट्रॅव्हल्सवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. शहरातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ‘ट्रक टर्मिनल’साठी तात्काळ जागा शोधण्याचे आणि खाजगी ट्रॅव्हल्स मालकांना स्वतःची स्वतंत्र पार्किंग व्यवस्था उभारण्याची सक्ती करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

‘सरप्राईज व्हिजिट’ अन् वाहतूक पोलिसांचा सावळागोंधळ उघडा!

खासदार धानोरकर यांनी मारलेल्या या अचानक ‘सरप्राईज व्हिजिट’मुळे स्थानिक वाहतूक पोलिसांचे पितळ उघडे पडले आहे. खासदार महोदया स्वतः पाहणीसाठी येत असल्याची बातमी फुटताच, वाहतूक निरीक्षक बारापात्रे हे स्वतः खाजगी ट्रॅव्हल्स मालकांना फोन करून रस्त्यावरून गाड्या हटवण्याच्या सूचना देत असल्याचे रंगेहात निदर्शनास आले. प्रशासकीय आडोशाखाली चालणारा हा हलगर्जीपणा आणि अभय देण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर खासदार धानोरकर यांनी संबंधित पोलीस यंत्रणेला चांगलेच खडे बोल सुनावले.

जनतेच्या जीवाशी खेळ सहन करणार नाही: खा. प्रतिभा धानोरकर

“जनतेच्या जीवाशी खेळणारा, अपघातांना आमंत्रण देणारा आणि रोजच्या वाहतुकीला अडथळा निर्माण करणारा निष्काळजीपणा अजिबात सहन केला जाणार नाही,” असा स्पष्ट आणि कडक इशारा खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिला. पुढील बैठकीत सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची १००% उपस्थिती आणि वाहतूक समस्येवर ठोस, कायमस्वरूपी तोडगा समोर दिसलाच पाहिजे, असे निर्देश त्यांनी दिले.

या धडक कारवाईवेळी जिल्हाधिकारी वसुमना पंत, आमदार सुधाकर अडबाले, मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रावसाहेब रगडे, वाहतूक निरीक्षक बारापात्रे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.