काटकसरीच्या कारभारामुळे सभासदांचे कोट्यवधी रुपये वाचले; सचिव कमलेश बिसेन यांनी मांडला साडेतीन वर्षांचा ऐतिहासिक ताळेबंद
- व्याजदर कपातीमुळे सभासदांचे ३.६४ कोटी रुपये वाचले; १६ सप्टेंबरपर्यंत शंका निरसनाची संधी
आमगाव: “निवडणुकीच्या वेळी सभासदांना दिलेल्या वचनानुसार संस्थेचा कारभार पूर्णपणे पारदर्शक, गतिमान आणि काटकसरीचा करण्यात आला आहे. केवळ नफा कमविणे हा संस्थेचा उद्देश नसून सभासदांचे कल्याण हाच मुख्य हेतू आहे. गेल्या साडेतीन वर्षांत घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांमुळे सभासदांचे कोट्यवधी रुपये वाचले असून संस्था आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम झाली आहे,” असा विश्वास जिल्हा परिषद व पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे सचिव कमलेश बिसेन यांनी व्यक्त केला.सालेकसा रोड येथील शुभमंगल म हॉल व लॉन येथे संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा (आमसभा) अत्यंत उत्साहात पार पडली. या सभेत संस्थेच्या साडेतीन वर्षांतील प्रगतीशील वाटचालीचा अहवाल सचिव कमलेश बिसेन यांनी सादर केला.
अहवालातील प्रमुख वैशिष्ट्ये आणि ऐतिहासिक निर्णय:
-
कमी व्याजदराचा थेट फायदा: पहिल्याच आमसभेत सभासद कर्ज व्याजदर थेट ८.७५% करण्यात आला. यामुळे साडेतीन वर्षांच्या कार्यकाळात एकूण ५१.३७ कोटी रुपयांच्या कर्जवाटपावर व्याजापोटी सभासदांचे ३.६४ कोटी रुपये वाचले. एका सभासदाला पूर्ण कर्ज कालावधीत एकूण ४,४६,२३४ रुपये व्याजापोटी कमी भरावे लागल्याने मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.
-
काटकसर आणि नोकर भरतीवर बंदी: संस्थेच्या खर्चात काटकसर करून अनावश्यक उधळपट्टी बंद करण्यात आली. तसेच नोकर भरतीवर कायमस्वरूपी बंदी आणून वाढता वेतनाची कुऱ्हाड थांबवण्यात आली.
-
कुटुंब कल्याण निधी योजना: गेल्या साडेतीन वर्षांत २८ मृत सभासदांच्या वारसांना २.४३ कोटी रुपयांची भरीव मदत देण्यात आली असून कर्जमाफीची मर्यादा २० पटीने वाढवली आहे.
-
आरोग्य संजीवनी व शैक्षणिक कर्ज: गंभीर आजारांवरील उपचारासाठी ५ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज सुविधा देण्यात आली, ज्याचा १० सभासदांनी (५० लाख रुपये) लाभ घेतला. तसेच पाल्यांच्या उच्च शिक्षणासाठी १% कमी व्याजदराने ५ लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देत ९ सभासदांना ४५ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले.
-
४० लाखांचे विमा संरक्षण: सभासदांना कुटुंब कल्याण निधी आणि ओरिएंटल व चोला मंडल विमा कंपनीमार्फत एकूण ४० लाख रुपयांचे अपघाती व सुरक्षा कवच तयार करण्यात आले आहे.
-
सुसंस्कृत वातावरणात चर्चा: पूर्वीच्या १५ मिनिटांत सभा गुंडाळण्याच्या संस्कृतीला फाटा देत महिलांनाही मनमोकळेपणाने व्यक्त होता येईल अशा लोकशाही मार्गाने साधक-बाधक चर्चा घडवून आणण्यात आली.

१६ सप्टेंबरपर्यंत शंका निरसनाची संधी-जे सभासद सभेला उपस्थित राहू शकले नाहीत, त्यांनी आपल्या शंका किंवा जमा-खर्चाच्या माहितीसाठी दिनांक १६ सप्टेंबर २०२६ पर्यंत संस्थेत प्रत्यक्ष येऊन किंवा संपर्क साधून निरसन करून घ्यावे, असे आवाहन सचिव बिसेन यांनी केले.या सभेला संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती दिपिका मोहन यादव, उपाध्यक्ष श्री. चंद्रशेखर एस. चौधरी, सचिव श्री. कमलेश बिसेन आणि शाखाप्रमुख श्री. सचिन कुथे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच संचालक मंडळातील मनोज गोंडाने, आनंदकुमार चर्जे, कुवरलाल रहांगडाले, हंसराज गजभिये, ओमेश्वर बिसेन, रितेशकुमार शहारे, अजयकुमार रामटेके, मनोज भुरे, वीरेंद्र कुंभरे, सुनील राठोड, नामदेव मेश्राम, रविकुमार पटले, चंद्रकांत धपाडे, सौ. रेखा पारधी, सौ. प्रेमलता बागडे, सौ. संगीता बिसेन आणि तज्ञ संचालक दयानंद फटिंग व सौ. सीमा भगत उपस्थित होते. सभेचा सांगता ‘स्वरुची भोजना’ने झाली.




