गोंदिया:गोरेगाव तालुक्यातील मोहाडी ते इंदिरानगर या अत्यंत महत्त्वाच्या मुख्य मार्गावर जागोजागी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिक आणि वाहनचालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून नवीन रस्त्याचे बांधकाम तात्काळ सुरू करावे, या मागणीसाठी गोंदिया जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती डॉ. लक्ष्मण भगत यांनी आज सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) गाठत आक्रमक भूमिका घेतली.या संदर्भात डॉ. लक्ष्मण भगत यांनी गोंदिया सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली व त्यांना मागण्यांचे निवेदन सोपवले.
मोहाडी ते इंदिरानगर हा मार्ग सततच्या वाहतुकीमुळे आणि खड्ड्यांमुळे अत्यंत धोकादायक बनला आहे. यामुळे लहान-मोठे अपघात रोजचेच झाले असून नागरिकांचा प्रवास अत्यंत कठीण झाला आहे. ही बिकट परिस्थिती लक्षात घेता, प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता रस्त्याचे काम तातडीने हाती घ्यावे, अशी आग्रही मागणी सभापतींनी केली.यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या दुरुस्तीबाबत व नवीन बांधकामाबाबत सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे. या पाठपुराव्यामुळे मोहाडी व इंदिरानगर परिसरातील नागरिकांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
“नागरिकांचा प्रवास सुरक्षित आणि सुकर व्हावा हीच आमची प्राथमिकता आहे. मोहाडी ते इंदिरानगर रस्त्याचे काम त्वरित सुरू न झाल्यास पाठपुरावा अधिक तीव्र केला जाईल. जनतेच्या सेवेसाठी आणि ग्रामीण भागातील विकासकामांच्या मंजुरीसाठी आमचा संघर्ष सतत सुरूच राहील.”— डॉ. लक्ष्मण भगत, अर्थ व बांधकाम सभापती, जि.प. गोंदिया





