30.9 C
Gondiā
Tuesday, September 8, 2026
Home विदर्भ रक्तपेढीतील तुटवडा दूर करण्यासाठी सीतेपारच्या तरुणांचे पुढाकार; ५९ जणांचे स्वयंस्फूर्त रक्तदान

रक्तपेढीतील तुटवडा दूर करण्यासाठी सीतेपारच्या तरुणांचे पुढाकार; ५९ जणांचे स्वयंस्फूर्त रक्तदान

0
8

निमित्ताची गरज नाही; माणुसकी पुरेशी!

गोंदिया,8 सप्टेंबर- रक्तदानासाठी वाढदिवस, वर्धापनदिन, सामाजिक कार्यक्रम किंवा एखादे विशेष निमित्त असायलाच हवे, असा समज समाजात रूढ आहे. मात्र, रक्ताची गरज ही निमित्त पाहून येत नाही आणि जीव वाचविण्यासाठी रक्ताची गरज असताना माणुसकीलाही निमित्ताची गरज नसते! याच माणुसकीचा प्रत्यय आमगाव तालुक्यातील सीतेपार या छोट्याशा गावातील तरुणांनी आपल्या कृतीतून घडवून दिला.

गोंदिया येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयातील शासकीय रक्तपेढीत रक्तसाठा कमी झाला असताना दुसरीकडे रुग्णांकडून रक्ताची मागणी वाढत आहे. परिसरातही जवळपास कोणतेही रक्तदान शिबिर आयोजित झाले नसल्याने गरजू रुग्णांसमोर रक्ताची उपलब्धता हा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. ही परिस्थिती लक्षात येताच सीतेपारच्या तरुणांनी कोणतेही विशेष निमित्त न शोधता थेट रक्तदानाचा निर्णय घेतला.

७ सप्टेंबर रोजी सीतेपार येथील वरिष्ठ प्राथमिक शाळेत आयोजित रक्तदान उपक्रमाला तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तब्बल ५९ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे अनोखे उदाहरण निर्माण केले. विशेष म्हणजे, या उपक्रमामागे ना मोठा सोहळा होता, ना प्रसिद्धीची अपेक्षा आणि ना वैयक्तिक कार्यक्रमाचे निमित्त. केवळ एखाद्या अनोळखी गरजू रुग्णाचा जीव वाचावा, एवढीच भावना घेऊन तरुण रक्तदानासाठी पुढे आले.

सीतेपारसारख्या छोट्याशा गावातून ५९ रक्तदाते पुढे येणे ही केवळ एक आकडेवारी नाही, तर ग्रामीण भागातील सामाजिक संवेदनशीलता आणि माणुसकीची ताकद दाखविणारा संदेश आहे. शहरांमध्ये मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करून रक्तदान शिबिरे घेतली जात असताना, एका ग्रामीण गावातील तरुणांनी रक्तपेढीतील तुटवडा लक्षात घेऊन कोणतेही निमित्त नसतानाही घेतलेला हा पुढाकार निश्चितच अनुकरणीय आहे.

रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांची शासकीय रक्तपेढीकडून रक्तगट, रक्तदाब, हिमोग्लोबिन व वजनाची तपासणी करण्यात आली. रक्तदात्यांना प्रमाणपत्र व रक्तदान कार्ड देण्यात आले. या कार्डच्या माध्यमातून दोन वर्षांपर्यंत रक्तदात्यांना आवश्यकतेनुसार मोफत रक्त उपलब्ध होण्याची सुविधा मिळते.या रक्तदान उपक्रमासाठी राजमाता जिजाऊ सार्वजनिक वाचनालयातील तरुणवर्ग, जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा व छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल, सीतेपार येथील शिक्षकवृंद, गावातील नागरिक तसेच शासकीय कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

‘निमित्त नको, गरज ओळखा!’

रक्तदान ही केवळ सामाजिक सेवा नसून एखाद्याला जीवनदान देण्याची संधी आहे. ‘आपले रक्त एखाद्याचे जीवन वाचवू शकते’ या जाणिवेतून सीतेपारच्या तरुणांनी केलेले रक्तदान इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरले आहे. रक्ताची गरज कोणत्याही एका कुटुंबापुरती मर्यादित नसते; ती कधीही, कोणालाही भासू शकते. त्यामुळे रक्तदानासाठी विशेष दिवसाची किंवा कार्यक्रमाची वाट न पाहता गरज ओळखून पुढे या, असा माणुसकीचा संदेश सीतेपारच्या तरुणांनी आपल्या कृतीतून दिला आहे.— विजय बिसेन, समाजसेवा अधीक्षक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, गोंदिया.