30.7 C
Gondiā
Wednesday, September 9, 2026
Home विदर्भ नेत्रदानाच्या संकल्पातून प्रकाशाची वाट;खासदार, आमदारांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले नेत्रदानाचा संकल्प 

नेत्रदानाच्या संकल्पातून प्रकाशाची वाट;खासदार, आमदारांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले नेत्रदानाचा संकल्प 

0
9
वाशिम,दि.9 सप्टेंबर : अंधत्व निर्मूलनाच्या लढ्याला बळ देत नेत्रदान चळवळीला व्यापक स्वरूप देण्यासाठी वाशिम जिल्ह्यात विशेष नेत्रदान प्रतिज्ञा अभियान राबविण्यात आले. या अभियानात लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्वतः नेत्रदानाची प्रतिज्ञा करून नागरिकांना मानवतावादी कार्यासाठी पुढे येण्याचा संदेश दिला.
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख, वाशिम-मालेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्यामभाऊ खोडे आणि कारंजा-मानोरा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सईताई डाहाके यांनी अभियानात उत्स्फूर्त सहभाग घेत नेत्रदानाची प्रतिज्ञा केली.
जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान आणि पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम पार पडला.
मृत्यूनंतरही डोळ्यांच्या माध्यमातून दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करता येतो, हा संदेश या अभियानातून देण्यात आला. नेत्रदानाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती वाढविणे, गैरसमज दूर करणे आणि अधिकाधिक नागरिकांना या मानवतावादी उपक्रमाशी जोडणे आवश्यक असल्याचे उपस्थितांनी सांगितले.
जिल्ह्यात नेत्रदान चळवळीला व्यापक स्वरूप देण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी स्वतः नेत्रदानाची प्रतिज्ञा केल्याने या चळवळीला निश्चितच चालना मिळणार आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी पुढे येऊन नेत्रदानाची प्रतिज्ञा करावी, असे आवाहन प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या वतीने करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. ठोबरे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अविनाश पुरी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद शिंदे, नेत्रदान समुपदेशक रमेश ठाकरे आणि संदीप आंबेकर यांनी विशेष पुढाकार घेतला.