लोकसहभागातून उभारलेली पळसगावची अभ्यासिका प्रेरणादायी – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा
गडचिरोली, दि. 9 सप्टेंबर : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक सुविधा गावातच उपलब्ध करून देण्यासाठी आरमोरी तालुक्यातील पळसगाव येथे ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारलेली ‘जनकल्याणम्’ अभ्यासिका प्रेरणादायी उपक्रम असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले. या अभ्यासिकेचे लोकार्पण जिल्हाधिकारी श्री. पंडा यांच्या हस्ते करण्यात आले.
या लोकार्पण सोहळ्यानिमित्त गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे ग्रामस्थ व युवकांना शुभेच्छा देत लोकसहभागातून उभारलेल्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.यावेळी वडसाचे उपविभागीय अधिकारी प्रसेनजित प्रधान, आरमोरीच्या तहसीलदार उषा चौधरी, गटविकास अधिकारी मंगेश आरेवार, नायब तहसीलदार दोनाडकर, सहायक गटविकास अधिकारी कुर्झेकर यांच्यासह ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. पंडा यांनी अभ्यासिकेची पाहणी करून ग्रामस्थ व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन अभ्यासाची सुविधा निर्माण केल्याबद्दल त्यांनी ग्रामस्थांचे कौतुक केले. लोकसहभागातून निर्माण होणाऱ्या अशा शैक्षणिक सुविधा गावाच्या विकासाला चालना देतात आणि अन्य गावांसाठीही प्रेरणादायी ठरतात, असे त्यांनी सांगितले.
अभ्यासिका ही केवळ अभ्यासासाठी जागा नसून विद्यार्थ्यांमध्ये नियमित अभ्यासाची सवय, शिस्त आणि स्पर्धात्मक वातावरण निर्माण करणारे केंद्र आहे. विद्यार्थ्यांनी या सुविधेचा जास्तीत जास्त उपयोग करून स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण तसेच विविध क्षेत्रांतील करिअरसाठी स्वतःला सक्षम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांमध्ये मोठी क्षमता आहे. त्यांना योग्य शैक्षणिक वातावरण, मार्गदर्शन आणि आवश्यक सुविधा मिळाल्यास ते विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करू शकतात. जिल्ह्यात निर्माण होत असलेल्या विकास व रोजगाराच्या संधींचा लाभ घेण्यासाठी युवकांनी शिक्षणासोबत कौशल्यविकासावरही भर द्यावा, असे जिल्हाधिकारी श्री. पंडा यांनी सांगितले.





