28.8 C
Gondiā
Tuesday, September 15, 2026
Home विदर्भ कमरगाव येथे नाली सफाईच्या मुद्याला घेऊन युवकाचे शोले स्टाईल आंदोलन

कमरगाव येथे नाली सफाईच्या मुद्याला घेऊन युवकाचे शोले स्टाईल आंदोलन

0
7

गोंदिया: नालीच्या सफाईच्या प्रलंबित मागणीवरून एका संतप्त युवकाने थेट ग्रामपंचायत इमारतीवर चढून आंदोलन सुरू केल्याची खळबळजनक घटना गोरेगाव तालुक्यातील कमरगाव येथे घडली. मागण्या पूर्ण न झाल्यास भाताच्या पिकावर मारण्याचे कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या करण्याची धमकी या युवकाने दिल्याने, प्रशासन आणि पोलिसांची चांगलीच धांदल उडाली. दिनेश नागपुरे असे या आंदोलक युवकाचे नाव आहे.

कमरगाव येथे गेल्या अनेक दिवसांपासून नाल्यांची नियमित सफाई झाली नसल्याने ठिकठिकाणी सांडपाणी तुंबले आहे. त्यामुळे गावात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता पसरली आहे. घरांसमोर घाण पाणी साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून डासांचा प्रादुर्भाव कमालीचा वाढला आहे. यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.

प्रशासकीय दुर्लक्षामुळे टोकाचे पाऊल नाल्यांची तात्काळ सफाई करण्यात यावी, यासाठी दिनेश नागपुरे यांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून निवेदने दिली होती. एवढेच नव्हे तर गोरेगाव पंचायत समिती आणि गोंदिया जिल्हाधिकाऱ्यांनाही यासंदर्भात निवेदने सोपवण्यात आली होती. मात्र, प्रशासनाकडून या गंभीर समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले, असा आरोप नागपुरे यांनी केला आहे. प्रशासनाच्या या उदासीन धोरणाला कंटाळून अखेर त्यांनी थेट ग्रामपंचायत इमारतीचे छत गाठले आणि शोले स्टाईल आंदोलन सुरू केले.

अग्निरोधक औषधाची बाटली अन् प्रशासनात घबराट नागपुरे यांच्याकडे भाताच्या पिकावर फवारणी करण्याचे कीटकनाशक (कीटकनाशक औषध) असल्याचे निदर्शनास आले. नाल्यांच्या सफाईबाबत तात्काळ ठोस निर्णय न घेतल्यास हे औषध प्राशन करून जीवन संपवू, असा इशारा त्यांनी दिल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी जमाव नियंत्रणात आणत नागपुरे यांची समजूत काढण्याचा आणि त्यांना सुरक्षितपणे खाली उतरवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. दरम्यान, या नाट्यमय आंदोलनानंतर तरी ग्रामपंचायत प्रशासन नाल्यांच्या सफाईबाबत काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.