31 C
Gondiā
Thursday, September 17, 2026
Home विदर्भ सडक अर्जुनीतील २० गावांत जलसंधारण, हवामानपूरक शेतीला चालना

सडक अर्जुनीतील २० गावांत जलसंधारण, हवामानपूरक शेतीला चालना

0
14

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून  परिवर्तन–विदर्भ वॉटर स्टुअर्डशिप प्रकल्पाची अंमलबजावणी

गोंदिया, दि. 17 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील २० गावांमध्ये एचडीएफसी बँक परिवर्तन–विदर्भ वॉटर स्टुअर्डशिप प्रकल्प (VWSP) राबविण्यात येत असून, जलसंधारण, हवामानपूरक शेती, ग्रामस्तरीय संस्थांचे सक्षमीकरण आणि शाश्वत उपजीविका विकासावर विशेष भर देण्यात येत आहे. वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (WOTR) यांच्या माध्यमातून मे २०२६ पासून या प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू आहे.

या प्रकल्पाबाबतचा सामंजस्य करार नुकताच करण्यात आला आहे. विदर्भातील ७ जिल्हे, ९ ब्लॉक आणि ५३५ गावांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत असून, त्यापैकी १८५ गावांमध्ये एचडीएफसी बँक परिवर्तनच्या माध्यमातून, तर ३५० गावांमध्ये PoCRAच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन, हवामानपूरक शेती, जलसंधारण आणि शाश्वत ग्रामीण विकासाच्या माध्यमातून विदर्भाच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याचा या प्रकल्पाचा उद्देश आहे. या उपक्रमामुळे विदर्भाचा चेहरा-मोहरा बदलण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामंजस्य कराराच्या प्रसंगी व्यक्त केला.

प्रकल्पांतर्गत सडक अर्जुनी तालुक्यातील सर्व २० गावांमध्ये ग्राम विकास समित्या (VDCs) स्थापन करण्यात आल्या असून, सहभागी नियोजन आणि स्थानिक पातळीवरील निर्णयप्रक्रियेला प्रोत्साहन दिले जात आहे. खरीप हंगामात शेतकरी शेतशाळा, कृषी प्रात्यक्षिके आणि अभ्यासदौऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हवामानपूरक कृषी पद्धती, आधुनिक तंत्रज्ञान आणि शाश्वत शेतीविषयक मार्गदर्शन दिले जात आहे.वंचित आणि गरजू कुटुंबांसाठी शेळीपालन व परसबागेतील कुक्कुटपालन यांसारख्या शाश्वत उपजीविका उपक्रमांसाठी लाभार्थी निवड प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेत भूमिहीन, विधवा, महिला-प्रमुख कुटुंबे आणि अल्पभूधारक कुटुंबांना प्राधान्य दिले जात आहे.

PoCRA सोबत शासकीय अभिसरण

PoCRA टप्पा-२ अंतर्गत ३२ गावांचा या उपक्रमात शासकीय अभिसरणाच्या माध्यमातून समावेश करण्यात येत आहे. गावपातळीवर ‘परिवर्तन भागीदार’ नियुक्त करून शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांची माहिती मिळवून देणे, योजनांचा लाभ मिळवून देणे आणि संबंधित विभागांशी आवश्यक समन्वय साधणे यावर भर दिला जाणार आहे.डिसेंबर २०२६ पासून बोडी नूतनीकरण, नाला खोलीकरण व रुंदीकरण, सिमेंट नाला बांध, नवीन बोडी तसेच इतर विविध पाणलोट विकासाची कामे टप्प्याटप्प्याने हाती घेण्यात येणार आहेत. या कामांमुळे जलसाठा वाढविणे, भूजल पुनर्भरणास चालना देणे, शेतीची उत्पादकता वाढविणे आणि गावांची हवामान बदलाशी जुळवून घेण्याची क्षमता मजबूत करण्यास मदत होणार आहे. व्रोटचे  संचालक प्रकाश केसकर,  प्रादेशिक व्यवस्थापक शरद भनगडे,प्रकल्प व्यवस्थापक, सडक अर्जुनी,  राहुल पंचभाई हे या प्रकल्पाचे काम पाहत आहेत.