31 C
Gondiā
Thursday, September 17, 2026
Home विदर्भ मतदारांनो, अंतिम यादीपूर्वी मतदार यादीत आपले नाव तपासा

मतदारांनो, अंतिम यादीपूर्वी मतदार यादीत आपले नाव तपासा

0
11

एसआयआर-2026 अंतर्गत गोंदियात आढावा बैठक; विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांचे आवाहन

गोंदिया, दि. 17 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम-2026 (SIR) अंतर्गत प्रारूप मतदार यादीवर प्राप्त दावे व हरकती निकाली काढण्याच्या प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी मतदार यादी निरीक्षक तथा नागपूर विभागाच्या विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली आज गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली असून, अंतिम यादीपूर्वी नागरिकांनी आपले नाव, पत्ता व इतर तपशील तपासून घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मंदार पत्की, उपजिल्हाधिकारी निवडणूक विजय अवधाने, उपविभागीय अधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी तसेच विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.पात्र नागरिक मतदार यादीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी मतदार यादीतील दावे, हरकती आणि दुरुस्ती अर्जांच्या प्रक्रियेचा आढावा घेतला. मतदारांनी मतदार यादीत आपले नाव, पत्ता, वय व इतर तपशील तपासून घ्यावेत. नाव नोंदविणे, नाव किंवा पत्त्यात दुरुस्ती करणे अथवा इतर आवश्यक बदल असल्यास विहित नमुन्यात अर्ज सादर करावा, असे त्यांनी सांगितले.

ज्या मतदारांच्या नावात विसंगती आहे किंवा ज्यांचे मॅपिंग झालेले नाही, अशा मतदारांना नोटीस प्राप्त झाल्यानंतर संबंधित बीएलओ/बीएलए यांच्याशी संपर्क साधावा. आवश्यक कागदपत्रांसह सुनावणीस उपस्थित राहून संबंधित बाबींची पूर्तता करावी. कोणताही पात्र नागरिक मतदार यादीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष शिबिरे
प्रारूप मतदार याद्या जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय कार्यालये, तहसील कार्यालये, मतदान केंद्रे तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयांमध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. राजकीय पक्षांनाही प्रारूप मतदार याद्या उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले.दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांची नावे तपासण्यासाठी तसेच वस्ती, तांडा, पाडे आदी दुर्गम भागातील नागरिकांना मतदार यादी तपासण्याची सुविधा मिळावी यासाठी विशेष शिबिरे आयोजित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

नाव नोंदणी व दुरुस्तीसाठी 30 सप्टेंबरपर्यंत संधी
मतदार यादीत नाव समाविष्ट नसल्यास किंवा दि. 1 ऑक्टोबर 2026 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण होत असल्यास नमुना 6 भरून द्यावा. मतदाराचे नाव वगळण्याबाबत हरकत असल्यास नमुना 7, तर नाव, वय, पत्ता यामध्ये दुरुस्ती करावयाची असल्यास किंवा एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर असल्यास नमुना 8 भरून द्यावा. संबंधित अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. 30 सप्टेंबर 2026 आहे.

प्रारूप मतदार यादी अंतिम नाही
विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात मतदारांच्या सर्वसाधारण निवासी असल्याबाबतच्या वस्तुस्थितीची पडताळणी करण्यावर भर देण्यात आला होता. त्यामुळे अर्जात नमूद केलेल्या पत्त्यावर प्रत्यक्ष वास्तव्यास नसलेल्या व्यक्तींचा समावेश प्रारूप यादीत करण्यात आलेला नाही. सध्याच्या टप्प्यात अशा मतदारांना ते सध्या वास्तव्यास असलेल्या ठिकाणच्या मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी अर्ज करण्याची संधी उपलब्ध आहे.याचप्रमाणे मृत मतदारांची नावे वगळण्यात आली असून, पात्र नवीन मतदारांची नोंदणी तसेच पहिल्या टप्प्यात विविध कारणांमुळे नाव समाविष्ट न झालेल्या पात्र नागरिकांना मतदार म्हणून नोंदणी करण्याची संधी उपलब्ध आहे.विशेष सखोल पुनरिक्षणाचा सध्याचा टप्पा नवीन पात्र मतदारांची नोंदणी आणि मतदार यादीतील आवश्यक दुरुस्त्यांवर केंद्रित आहे. त्यामुळे सध्या प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीची आधीच्या आकडेवारीशी तुलना करून निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. अंतिम मतदार यादी अधिकृतपणे प्रसिद्ध झाल्यानंतरच त्याबाबत मूल्यमापन करावे, असे आवाहन करण्यात आले.अंतिम मतदार यादी दि. 4 नोव्हेंबर 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून, या प्रक्रियेत सर्व पात्र नागरिकांचा समावेश सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे.