31 C
Gondiā
Thursday, September 17, 2026
Home विदर्भ रिफ्लेक्टरच्या उजेडातून सुरक्षेचा संदेश!

रिफ्लेक्टरच्या उजेडातून सुरक्षेचा संदेश!

0
18

नवज्योत फाउंडेशनचा सायकल सुरक्षा अभियान; १२० सायकलींवर लावले रिफ्लेक्टर
गोंदिया, १७ सप्टेंबर-रस्ते सुरक्षा ही केवळ नियमांची बाब नसून प्रत्येकाच्या जीवनाशी निगडित जबाबदारी आहे. याच सामाजिक जाणीवेतून श्री नवज्योत फाउंडेशनच्या वतीने सायकल सुरक्षा अभियान राबविण्यात आले. टी-पॉइंट, गोंदिया येथे झालेल्या या उपक्रमाद्वारे रात्रीच्या वेळी सायकलस्वारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधोरेखित करत नागरिकांना जनजागृतीचा संदेश देण्यात आला.
अभियानांतर्गत शहरातून ये-जा करणाऱ्या १२० सायकलींवर रिफ्लेक्टर बसविण्यात आले. रात्रीच्या अंधारात सायकलस्वार इतर वाहनचालकांना सहज दिसावेत आणि संभाव्य अपघाताचा धोका कमी व्हावा, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.
यावेळी *‘गोंदिया चा चिंतामणी’*च्या कार्यकर्त्यांनीही सक्रिय सहभाग घेत सायकलस्वारांना वाहतूक नियमांचे पालन, रात्रीच्या वेळी अधिक काळजीपूर्वक सायकल चालविणे आणि स्वतःच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे आवाहन केले.
सुरक्षिततेसाठी मोठ्या उपाययोजनांइतकेच छोटे-छोटे प्रतिबंधात्मक उपायही महत्त्वाचे ठरतात, हा संदेश या अभियानातून देण्यात आला. एका सायकलीवर लावलेला रिफ्लेक्टर कदाचित छोटा वाटेल; मात्र तो एखाद्या वाहनचालकाच्या नजरेत सायकलस्वाराला आणून संभाव्य दुर्घटना टाळण्यास कारणीभूत ठरू शकतो.
श्री नवज्योत फाउंडेशनकडून सामाजिक सेवा, आरोग्य, पर्यावरण, नागरिक सुरक्षा आणि जनजागृतीशी संबंधित विविध उपक्रम सातत्याने राबविले जातात. त्याच सामाजिक बांधिलकीच्या मालिकेतील हा उपक्रम नागरिकांच्या सुरक्षेबाबत सकारात्मक संदेश देणारा ठरला.
‘सुरक्षा ही प्रशासनाचीच नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे,’ या भावनेतून सायकलस्वारांसह दुचाकी व चारचाकी वाहनचालकांनीही वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.