महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकांशी सावत्र व्यवहार : डेली रेल्वे मुव्हर्स देणार निवेदन

0
16

गोंदिया दि. 28 –: दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या बिलासपूर झोनमध्ये मोडणाऱ्या गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर व नागपूर जिल्ह्यातील काही भाग येथील रेल्वे स्थानकांच्या विकासाबाबत सावत्र व्यवहार केला जात आहे. छत्तीसगडच्या गेवरा रोड, कोरबा, रायगड, बिलासपूर, रायपूर, दुर्ग या स्थानकांना प्रवासी गाड्या सोडण्यासाठी उपयुक्त बनविले जात आहे. तर चांदाफोर्ट, इतवारी, भंडारा रोड, तिरोडा, गोंदिया या स्थानकांची उपेक्षा करण्यात आली, असा आरोप डेली रेल्वे मुव्हर्स असोसिएशनने केला आहे.

बिहार, यूपीवरून येणाऱ्या अनेक गाड्या गोंदियापर्यंत विस्तारित करण्यात आल्या नाहीत. बिलासपूर, दुर्गवरून अनेक महत्वपूर्ण ४० गाड्या, गेवरारोड, रायगड, रायपूर, कोरबावरून अनेक प्रवासी गाड्या सुरू होतात. परंतु चांदाफोर्ट, इतवारी, गोंदिया स्थानकातून केवळ पॅसेंजर गाड्या सुटतात. गोंदियावरून सुटणाऱ्या विदर्भ व महाराष्ट्र एक्सप्रेस दुसऱ्या झोनच्या गाड्या आहेत. रेल्वेचे महाव्यवस्थापक सत्येंद्र कुमार यांचा गोंदिया दौरा २९ डिसेंबरला होणार असून सदर समस्यांचे निवेदन ड्रामचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल, सचिव अशोक शर्मा, त्यांना देणार आहेत. स्थानकाच्या प्रत्येक फलाटावर टॉयलेटची समस्या असून ही समस्या सोडविण्यात यावी. उत्तरी व दक्षिण भागातील स्कूटर-कार पार्किंग कंत्राटावर द्यावे. त्यांच्या जागेचे सीमांकन दर्शविण्यात यावे. रेटबोर्ड मोठ्या अक्षरात दर्शनिय भागात लावावे. रेल्वे क्षेत्रातील स्थायी व अस्थायी अतिक्रमण हटविण्यात यावे. स्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर किरकोळ विक्रेत प्रवाशांना रस्ता थांबवितात, ते हटविण्यात यावे. तिकीट घरासमोरील लोखंडी कटघरे हटविण्यात यावे. मल्टी फंक्शनल कॉम्प्लेक्सला उपयोगात आणण्यासाठी योग्य कार्यवाही करावी. होमप्लॅटफॉर्मवरून महाराष्ट्र व विदर्भ एक्सप्रेस सुरू करावे, टीटी-पुरी गाडीचा थांबा द्यावा या मागण्या आहेत.