मनोधैर्य योजना जिल्हा ट्रामा टिमचे प्रशिक्षण

0
16

गोंदिया,दि.३० : बालकांवरील लैंगीक अत्याचार, ॲसिड हल्ला व बलात्कारपिडीत महिलांना तातडीने आधार देण्यासाठी व या मानसिक आघातातून बाहेर पडण्यासाठी सहाय्यभूत ठरणाऱ्या मनोधैर्य योजनेच्या जिल्हा ट्रामा टिमचे प्रशिक्षण २८ डिसेंबर रोजी कटंगीकला येथील मयूर लॉन येथे उत्साहात संपन्न झाले.
प्रशिक्षणाचे उदघाटन न्या.ए.एच.लध्दड यांनी केले. अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, तज्ञ मार्गदर्शक म्हणून सविता बेदरकर, अनिल रेवतकर, वैशाली केळकर, प्रा.संगीता घोष यांची उपस्थिती होती.
श्रीमती बेदरकर यांनी मनोधैर्य योजना- संबंधित यंत्रणेच्या प्राथमिक स्तरावर आवश्यकता व महत्व, प्रा.घोष यांनी मनोधैर्य योजनेत प्रत्यक्ष काम करतांना प्रकरण संवेदनशीलपणे हाताळण्यात यावे याकरिता प्रत्येक व्यक्तीने सामाजिक बांधिलकी जपून करणे याविषयी, श्री.रेवतकर यांनी या योजनेची पार्श्वभूमी, अंमलबजावणीसाठी संबंधित यंत्रणेचा सहभाग, श्रीमती केळकर यांनी कायदेविषयक सहाय्य व एफ.आय.आर. लिहितांना घ्यावयाची काळजी, रजनी रामटेके यांनी ट्रामा टिम तयार करण्यामागचा उद्देश, हेतू, कर्त्यव्य व जबाबदाऱ्या, सुहास बोंदरे यांनी लैंगीक शोषणापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ मधील तरतूदी व अंमलबजावणी या विषयावर मार्गदर्शन केले.
यावेळी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, मानसोपचार तज्ञ, अधिपरिचारिका यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नम्रता चौधरी यांनी केले. परिविक्षा अधिकारी के.बी.रामटेके यांनी संचालन केले, उपस्थितांचे आभार परिविक्षा अधिकारी राजु बोदले यांनी मानले.