हाॅटेल बिंदल प्लाझा अग्नीकांडात आठव्या दिवशी अखेर 6 जणांवर गुन्हा दाखल

0
11

आरोपींना पसार होण्यास जिल्हा प्रशासनासह पोलीसांची मदत

भाजपने प्रकरण दाबण्यासाठी केला राजकीय बळाचा वापर
प्रसारमाध्यमांनी प्रकरण लावून धरल्यानेच गुन्हा दाखळ

गोंदिया,दि.30 -गोंदिया शहराच्या मुख्य बाजारपेठ असलेल्या गोरेलाल चैकातील 4 माल्याच्या बिंदल प्लाझा या हाॅटेलात गेल्या बुधवारी 21 डिसेंबरला घडलेल्या अग्नीकांडात निष्पाप सात जणांना आपला जीव गमवावा लागला होता.या घटनेत 29 डिसेंबर ला आठव्या दिवशी हाॅटेल बिंदलचे संचालकासह 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.मात्र या आठ दिवसात जिल्हा प्रशासन,पोलीस विभाग व भाजपच्यावतीने संबधित आरोपींना वाचविण्याचा सातत्याने प्रय़त्न झाला.परंतु गोंदियातील सर्वच प्रसार माध्यमांनी निष्पक्षपणे या प्रकरणाला उचलून धरल्यानेच पोलीस विभागाला नाईलाजास्तव गुन्हा दाखल करावा लागला असला आरोपींना पसार होण्यास अनपेक्षित सहकार्य केल्याचे स्पष्ट जाणवत आहे.
याप्रकरणात बेरार टाईम्सने सातत्याने वृत्तप्रकाशित करुन पोलीस व जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त करीत गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे लक्षात आणून दिले होते.त्यातच गोंदिया नगरपालिकेच्या प्रचारासाठी येणारे मुख्यमंत्री पारदर्शकतेवर कसे बोलणार अशा प्रश्न उपस्थित केला होता.त्याची दखल शेवटी प्रशासनाला घेत गुन्हा दाखल करावे लागले आहे.
गोंदिया शहरामध्ये अश्याप्रकारे यापूर्वी ईमारत कोसळून पडलेल्या,आवारभिंत पडून मजूरांचा जीव गमावल्या प्रकरणी घडलेल्या घटनेत लगेच गुन्हा दाखल करण्यात आले होते. प्रथम दर्शनी हॉटेल्स मध्ये आग विझविण्याबाबत तसेच इतर गैरसोयी देखील प्रशासनाला आढळून आल्या होत्या मात्र घटना घडल्यानंतर सुद्धा या हॉटेल प्रशासनावर तसेच येथील संचालकांवर कुठलीही कारवाही प्रशासनातर्फे करण्यात आली नव्हती .एकूणच राजनेैतिक दबावतंत्र तर या कारवाही ला बळी पडत नाही ना असा संतप्त सवाल शहर वासियांतर्फे करण्यात येत होता गोंदिया शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक व तपास अधिकारी जितेंद्र बोरकर यांच्यानुसार जोपर्यंत नगरपालिकेच्या अग्निशमन विभाग व नगररचनाकार विभागाचा अहवाल येणार नाही,तोपर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल होणार नाही अशी शक्यता वर्तविली होती.
गुरूवारी नगरपालिकेच्या अग्निशमन विभाग व नगररचनाकार विभागाचा अहवाल येताच तपास अधिकारी जितेंद्र बोरकर यांनी हाॅटेल संचालकांसह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती दिली आहे. यात हाॅटेल बिंदल प्लाझा थाॅट-बाॅटचे मुख्यसंचालक डाॅ. राधेश्याम अग्रवाल ,आशिष अग्रवाल, धीरज अग्रवाल तसेच पहिल्या माल्यावरचा भाडेकरू झी विक्री प्रदर्शनीचे संचालक सुरेंद्र बंसोड, हाॅटेलचे दोन व्यवस्थापक लोकेश वैकुंठी व विश्वजीत खोब्रागडे यांचेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या यातील सर्व सहा आरोपी फरार असल्याचीही माहिती तपास अधिकारी बोरकर यांनी बोलतांना दिली.
यात विशेष म्हणजे मुख्य संचालक डाॅ.राधेश्याम अग्रवाल हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तसेच गोंदियातील नावाजलेली जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष आहेत. तसेच डाॅ.राधेश्याम अग्रवाल गोंदियाचे काॅग्रेसचे आमदार गोपालदास अग्रवाल यांचे हे सख्खे नातेवाईक असल्यानेच याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यास पोलीस यंत्रणेकडून टाळाटाळ केली जात होती. .एकंदरीत सात जणांचा होरपळून मृत्यु एवढ्या मोठ्या घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगेच नगरपरिषदेचे मुख्याधिकारी,उपविभागीय अधिकारीसह जिल्हाधिकारी व पोलीस विभागाच्या संबधित अधिकाया-वर कारवाई करुन याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश द्यायला हवे होते.पंरतु सध्या गोंदिया नगरपरिषदेची निवडणुकीच्या प्रचाराचा माहोल असल्यानेच भाजपसह सर्वच पक्ष या प्रकरणात गपचुप होते. त्यामुळे सर्वसामान्य जनतेतही भाजप सरकारच्या स्वच्छ व निष्पक्ष प्रशासनाबाबत शंका निर्माण होत असताक्षणी नगरपालिकेच्या अग्निशमन विभाग व नगररचनाकार विभागाचा अहवाल येताच तपास अधिका-यांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी घटनास्थळातून तब्बल 30 च्या जवळपास गैस सिलेंडर पोलिसांनी हस्तगत केले आहे. घटनेच्या दिवशी अग्निशमन विभागाच्या अधिकारी प्रकाश कापसे यांनी 40 सिलंेडर असल्याची माहिती दिली होती.10 सिलेंडर कुठे गायब झाले हा ही तपासाचा विषय असणार ! एवढी मोठी घटना जिल्ह्यातील इतिहासतली पहिलीच आहे,परंतु अद्यापपर्यंत जिल्हाधिकारी डाॅ.अभिमन्यू काळे यांनीही या घटनेबाबत माध्यमांशी सवांद साधलेला नाही,उलट या प्रश्नाबाबत ते टाळाटाळ करीत असल्याचे त्यांना संपर्क केल्यानंतर दिसून आले.
पालिकेच्या अग्निशमन विभाग व नगररचनाकार विभागाकडून हाॅटेल बिंदल प्लाॅझा अग्निकांडाप्रकरणी प्राथमिक अहवाल पोलिसांना सादर केल्यानंतर या प्रकरणातील सहा जणांवर कलम 304,201,34,भादवि सहकलम 52,54, टाॅउन प्लानिंग अक्ट कलम 189 महाराष्ट म्युनिसिपल काॅरपोरेट अक्ट कलम 36 ,महाराष्ट फायर प्रीव्हेन्शन अॅण्ड लाईफ मेजर्स अक्ट अंतर्गत, शिवाय आग लागल्यानंतर संगनमत करून पुरावे नष्ट करण्याचा देखील गुन्ह्याचा समावेश असून या प्रकरणी दोषी आढळून आलेल्या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी एवढया मोठया अवैध बांधकाम निर्माणाची परवानगी देतांनी तसेच फायर सुरक्षेसंबंधी निष्काळजीपणावर पालिकेच्या अधिका-यांसह जो कुणी या प्रकरणी तपासात दोषी आढळल्यावर त्यांच्यावर ही गुन्हे दाखल होणार असल्याचे गोंदिया जिल्हा पोलिस अधीक्षक डाॅ. दिलीप भुजबळ पाटील यांनी ‘बेरार टाईम्स’ शी बोलतांना सांगितले.