अध्यक्षपदासाठी गोंदियात १४ तर तिरोड्यात ८ रिंगणात

0
6

गोंदिया,दि.30: नगर परिषद निवडणुकीतील नामांकन मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी गुरूवारी (दि.२९) अनेक उमेदवारांनी पुढाकार घेतला. गोंदियात नगराध्यक्षपदाच्या शर्यतीतून १८ उमेदवारांनी तर सदस्यपदासाठी अर्ज करणाऱ्या ५० उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी १४ उमेदवार शिल्लक राहिले आहेत.तर तिरोड्यात 8 उमेदवार नगराध्यक्षाच्या रिगंणात राहिले आहेत. आज शुक्रवारी (दि.३०) अधिकृत राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह सर्वांना निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. त्यानंतर निवडणुकीचा खरा रणसंग्राम सुरू होणार आहे.
नगर परिषदेच्या निवडणुकीचा रणसंग्राम तसा ७ तारखेपासूनच सुरू झाला आहे. त्यात निवडणूक कार्यक्रमानुसार दाखल करण्यात आलेले नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा शेवटचा दिवस गुरूवारी (दि.२९) होता. त्यामुळे सध्यातरी रिंगणात उभ्या असलेल्या उमेदवारांचा आतापर्यंत अस्पष्ट असलेला आकडा अखेर स्पष्ट झाला.नगर परिषदेच्या निवडणुकीत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत नगराध्यक्षपदासाठी ३८ उमेदवारांनी ५२ अर्ज दाखल केले होते. सदस्यपदाच्या ४२ जागांसाठी २७७ अर्ज दाखल करण्यात आले होते.

मात्र गुरूवारी (दि.२९) नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्षपदासाठीचे १८ अर्ज मागे घेण्यात आले. तसेच सदस्यत्वसाठीचे ५० अर्ज मागे घेण्यात आले आहेत. हे अर्ज मागे घेण्यात आल्याने नगराध्यक्ष तसेच सदस्यांसाठीचे चित्र अधिकच खुलले असून आता उमेदवारांना आपली तयारी करायला अधिकच सुलभ होणार आहे.