आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न- राजकुमार बडोले

0
12

गोंदिया,दि.१4 : पूर्वी डॉक्टर गावात उपलब्ध नसल्यामुळे लोक वैदू, मरीमाईच्या मागे लागायचे. आता लोकांचा शिक्षणावर भर असल्यामुळे आरोग्याच्या बाबतीत सुधारणा झाल्या आहेत. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राच्या इमारती उभारुन आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.१२ फेब्रुवारी रोजी सडक/अर्जुनी तालुक्यातील घटेगाव येथे आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे भूमीपूजन करतांना आयोजित कार्यक्रमात श्री.बडोले बोलत होते. अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती कविता रंगारी होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य श्रीमती शिला चव्हाण, पंचायत समिती सदस्य राजेश कठाणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.डी.वाय.ब्राम्हणकर, घटेगावच्या सरपंच रेखा कोसलकर, उपसरपंच कांता गायधने, पोलीस पाटील कुंदा नेवारे, प्रतिष्ठीत नागरिक विष्णुजी अग्रवाल यांची उपस्थिती होती.पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, तालुक्यातील चिखली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे भूमीपूजन तर भिवखिडकीच्या आरोग्य केंद्राचे कोकार्पण लवकरच करण्यात येणार आहे. सौंदड येथील ग्रामीण रुग्णालयात ट्रामा केअर सेंटर तर सडक/अर्जुनी ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. घटेगाव व परिसरातील गावातील विविध समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.प्रास्ताविकातून डॉ.निमगडे यांनी सांगितले की, जिल्ह्यात २९ आरोग्य उपकेंद्र मंजूर झाले असून ९ उपकेंद्रासाठी निधी प्राप्त झाला आहे. तसेच ७ पैकी ५ आरोग्य केंद्रासाठीही निधी मिळाला आहे. घटेगाव व परिसरातील ३ हजार लोकांना या उपकेंद्राच्या सुविधांचा लाभ मिळणार आहे. असेही ते म्हणाले. कार्यक्रमाला डॉ.श्री.गुंड व आरोग्य विभाग कर्मचारी तसेच घटेगावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार श्री.उरकुडे यांनी मानले.