जिल्ह्यातील 240 संगणक परिचालक निष्कासित

0
25

अमरावती – संग्राम महाऑनलाइन कक्षाच्या धोरणाविरोधात 12 नोव्हेंबरपासून संपावर गेलेल्या 240 ग्रामपंचायत संगणक परिचालकांना घरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. ग्रामविकासमंत्र्यांच्या सूचना पायदळी तुडवित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ही कारवाई केल्याचा आरोप संगणक परिचालकांनी केला असून या कारवाईविरोधात त्यांनी शुक्रवारी “सीईओं‘च्या कार्यालयावर धडक दिली.

राज्यातील संपूर्ण ग्रामपंचायतींमध्ये कंत्राटी स्वरूपावर कार्यरत डाटा एन्ट्री ऑपरेटरांच्या काही मागण्या असून, त्यांच्या पूर्ततेसाठी 12 नोव्हेंबरपासून या संगणक परिचालकांनी संपाचे हत्यार उपसले आहे. विशेष म्हणजे संप सुरू असला तरी अद्याप राज्य शासन तसेच महाऑनलाइन संग्राम कक्षाकडून कुठलीच दखल घेण्यात आली नाही. दरम्यान, संघटनेच्या प्रतिनिधींनी याबाबत ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्याशी चर्चा केली असता त्यानी 7 ते 9 जानेवारीदरम्यान या विषयावर तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले होते, तसेच पत्रसुद्धा संघटनेला प्राप्त झाले. मात्र; ग्रामविकासमंत्र्यांच्या पत्राला केराची टोपली दाखवित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांच्याकडून प्राप्त अहवालावरून महा ऑनलाइनकडून जिल्ह्यातील संपकरी 843 पैकी 240 संगणक परिचालकांना गेल्या दोन दिवसांत घरी बसविण्यात आले आहे. अचानक झालेल्या या कारवाईमुळे संगणक परिचालक पार हादरून गेले असून त्याचा जाब विचारण्यासाठी शुक्रवारी त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांचे दालन गाठले, मात्र त्या ठिकाणी श्री. भंडारी यांच्या उत्तराने त्यांचे समाधान न झाल्याने कर्मचाऱ्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांचे दालन गाठले. या कारवाईमुळे संगणक परिचालकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली असून ही कारवाई एकतर्फी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चेच्यावेळी अमरावती जिल्हा ग्रामपंचायत संगणक परिचालक संघाचे अध्यक्ष अमोल वाडी, गणेश वानखडे, अमोल ठवळे, अमित अढाऊ, मनीष वानखडे, श्‍याम गायन, सागर राऊत, श्रीकांत मुऱ्हेकर, दीपक बनारसे, मनीष जयस्वाल, मनीष शहाणे यांच्यासह अन्य उपस्थित होते.