वन व्यवस्थापनातून गावे समृध्द करा-बडोले

0
15

सोदलागोंदी येथे निसर्ग पायवाटचा शुभारंभ
गोंदिया,दि.२५ : ग्राम वन आणि संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून वनालगतच्या गावाच्या विकासाला चालना मिळत आहे. या गावांनी आता वनांचे योग्य व्यवस्थापनातून रोजगार निर्मिती करुन गावे आर्थिकदृष्ट्या समृध्द करावी. असे आवाहन पालकमंत्री यांनी केले.२४ फेब्रुवारी रोजी गोरेगाव तालुक्यातील ग्राम वन सोदलागोंदी येथे संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या वतीने वन महोत्सव व निसर्ग पायवाटचा शुभारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून पालकमंत्री बडोले बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर, पं.स.सभापती दिलीप चौधरी, तहसिलदार कल्याणकुमार डहाट, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक रेखलाल टेंभरे, जि.प.सदस्य ज्योती वालदे, पं.स.सदस्य अलका काटेवार, ललिता बहेकार, सहायक वनसंरक्षक एस.एस.शेंडे, वनपरिक्षेत्र अधिकारी एस.एम.जाधव, पोलीस निरिक्षक सुरेश कदम, बुरड कामगार नेते लक्ष्मणराव चंद्रिकापुरे, न.प.उपाध्यक्ष नितीन बारेवार, मुरदोली सरपंच ससेंद्र भगत, पोलीस पाटील दिलीप मेश्राम, ग्राम वन समितीचे अध्यक्ष बाबुलाल फरदे, तंटामुक्तीचे अध्यक्ष गोविंद राऊत, मुंडीपारच्या सरपंच सिंधू मोटघरे यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी बडोले पुढे म्हणाले, इथल्या नागझिरा महिला बचतगटाने मोहाचे लोणचे, लाखेपासून बांगड्या तयार केल्या असून निर्धुर चुलीचे उत्पादन सुध्दा येथे होत आहे. रोजगार निर्मितीच्या दृष्टीने अत्यंत चांगले पाऊल इथल्या ग्रामस्थांनी उचलले आहे. महिलांच्या बचतगटाला कर्जपुरवठा उपलब्ध करुन त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तुला बाजारपेठ मिळाली पाहिजे. त्यामुळे त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. आदिवासी उपयोजने अंतर्गत जे लाभार्थी गॅस कनेक्शनपासून वंचित आहेत त्यांना कनेक्शन देण्यात येईल. या गावात येणारी राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा कायम सुरु राहील असे त्यांनी सांगितले.
आरोग्याच्या सोयीसुविधा इथे नसल्याचे सांगून पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, भविष्यात या भागातील काही गावांसाठी आरोग्य उपकेंद्र सुरु करण्यासाठी आणि या गावापासून ग्रामपंचायतचे अंतर जास्त असल्यामुळे या गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत तयार झाली पाहिजे यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. जागा उपलब्ध झाल्यास ग्रामस्थांना सभा मंडप बांधून देण्यात येईल. हा भाग अभयारण्य लगत असल्यामुळे वन्य प्राण्यांपासून शेतीचे नुकसान आणि प्रसंगी जिवितहानी होत असल्यामुळे वन विभागाकडून वेळीच मोबदला देण्यात येईल. गावाजवळील तलावाचे खोलीकरण करुन पाणीसाठा वाढण्यास मदत होईल. संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून ३०० हेक्टर जंगलाचे व्यवस्थापन करण्यात येत असल्यामुळे गावाच्या विकासाला चालना मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ.रामगावकर म्हणाले, सोदलागोंदी हे गाव वनसंपदेने नटलेले आहे. या गावातील लोकांनी वन आणि वन्यप्राण्यांना आपल्या मनात जागा दिली आहे. शासनाच्या विविध योजना या गावात राबविण्यात येत आहे. ग्रामस्थांचे चांगले सहकार्य प्रशासनाला मिळत आहे. इथल्या महिला आणि पुरुषांनी लाखेपासून बांगड्या तयार करण्याचे प्रशिक्षण घेतल्यामुळे रोजगाराच्या दृष्टीने या व्यवसायाला महत्व आले आहे. निसर्ग पायवाट तयार केल्यामुळे पर्यटकांची पाऊले सोदलागोंदीकडे वळतील. पर्यटनातून होम स्टे ची सुविधा या गावात भविष्यात उपलब्ध होणार आहे. तलावाच्या परिसरात पक्षी निरिक्षण मनोरा बसविण्यात येईल. असे त्यांनी यावेळी सांगितले.
श्री.चौधरी म्हणाले, निसर्गाच्या सानिध्यात येथील लोक जीवन जगत असल्यामुळे ते भाग्यवान आहेत. सर्वच प्रकारच्या प्रदुषणापासून ते दूर आहेत. वन आणि मानवाचा जवळचा संबंध आहे. त्यामुळे वनांचे रक्षण करणे हे प्रत्येकाची जबाबदारी आहे. वन विभाग या गावासाठी अनेक योजना राबवित असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जि.प.सदस्य श्रीमती वालदे, श्री.चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी महाराष्ट्र हरित सेनेत सोदलागोंदी हे गाव सहभागी झाल्याबद्दल पालकमंत्र्यांच्या हस्ते रुपलाल डोल्हारे व अन्य ग्रामस्थांना तसेच नागपूर परीक्षा मंडळाच्या दहावीच्या परीक्षेत आदिवासी विभागातून दुसरा आलेल्या चेतन राऊत याचा प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक सरपंच ससेंद्र भगत यांनी केले. कार्यक्रमाला सोदलागोंदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.